नाशिक आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्याला टॉयलेटमध्ये दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप नागनाथराव वडजे असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील आदिवासी विकास विभाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय नाशिकला असून सध्या हा विभाग लाचखोरीमुळे विशेष चर्चेत आला आहे. याच विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल हे तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले विभागातील कळवण विभागाचा सहाय्यक अधिकारी आहेत.
ही घटना ताजी असतानाच आता याच विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वडजे जाळ्यात सापडले आहे. या अधिकाऱ्याने चक्क टॉयलेटमध्ये १० हजारांची लाच घेतली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या पथकाने सापळा रचून या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. वडजे यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे रोजंदारी वरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. ते कामाठी किवा स्वयंपाकी असे नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात त्यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि ते आज एसीबीच्या हाती लागले. याप्रकरणी एसीबीने अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे, कळवण येथील उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती जाधव, राजेश गिते, शरद हेंबाडे, पोलीस कर्मचारी संतोष गांगुर्डे व अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.