उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आता शाळा सुरु झाल्या आहे. शाळा सुरु झाल्यावर शाळेत काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाशीच्या शाळेत काल जय श्रीरामाच्या घोषणे नंतर गदारोळ निर्माण झाला तर मुंबईतील कांदिवली येथे सकाळच्या शाळेतील प्रार्थनेदरम्यान अजान वाजवल्याची घटना समोर आली आहे. याविरोधात राजकीय कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी कांदिवली येथे कपोल इंटरनॅशनल स्कूलबाहेर निदर्शने केली. अजान वाजवणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. दरम्यान, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी ते तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवली पश्चिमेकडे महावीरनगर येथे कपोल विद्यानिधी शाळेत प्रार्थनेच्या वेळी अजान वाजविल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर पालकांनी शाळेत जाऊन निदर्शने केली. पालक व शिवसेना कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात जमून घोषणाबाजी केली.
सात वाजण्याच्या सुमारास लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यात आली. भाजपचे स्थानिक आमदार योगेश सागर हेही आंदोलनात सहभागी झाले होते. हे चुकून नव्हे तर जाणूनबुजून करण्यात आले असून, शाळेला जबाबदार शिक्षकाला संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्रकारांना सांगितले की, शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.