राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. कलम 156/3 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होता. वंचितनं यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर वंचित बहुजन आघाडीनं राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडूंवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोला पोलिसांकडे केली आहे.