बनावट सोने बँकेत ठेवून 24 लाखांचे कर्ज काढून आयसीआयसीआय बँकेला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नितीन कचरू कातोरे (रा. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी), संतोष नारायण थोरात (कसबे वणी, ता. दिंडोरी), नीलेश विकास विसपुते (वय ३४, पंचवटी), रावसाहेब सुकदेव कातोरे (वाडीवऱ्हे) अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी सुधीर लक्ष्मण जोशी (वय ५२, उमिया शक्ती सोसायटी, बनकर चौक, काठे गल्ली) यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंबड आणि इंदिरानगर शाखेत २० ते २४ डिसेंबरदरम्यान चौघांनी बँकेच्या व्हॅल्युअरसोबत संगनमत करून बँकेकडे सोन्याचे बनावट दागिणे तारण ठेवून २४ लाख १८ हजार ३९१ रुपयांचे कर्ज काढले. बँकेत सोने तारण कर्जापोटी दोन वेगवेगळी प्रकरणातून हा गंडा घातला गेला.
आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेच्या बँक खात्यात २४४.७० ग्रॅमचे बनावट सोन्याच्या दागिन्याच्या तारणावर १५ लाख ४० हजार २२१ रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले, तर अंबड येथील बँकेच्या खात्यात ३१० ग्रॅमच्या सोन्याचे बनावट दागिने गहाण ठेवून आठ लाख ७८ हजार १७० रुपयांचे कर्ज काढले. बनावट दागिने सोन्याचे आहेत, असे भासवून संगनमताने हा गंडा घातल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.