भंडारा : भंडाऱ्यात बुधवारी प्रहार पक्षाच्यावतीने वनविभागाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बच्चू कडू यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, पालकमंत्री हे प्रत्येक जिल्ह्याला दिलेच पाहिजे. यामध्ये सरकार थोडे चुकत आहे. तुम्ही कोणालाही पालकमंत्री करा, पण एकाकडे सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्याने त्या जिल्ह्यांचे नुकसान होत आहे, यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे, अशी खदखद बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
यावेळी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यात पुराच्या फटक्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांनी जिल्ह्याला भेट दिली नाही. मी सरकारमध्ये असलो तरी सरकार थोडे चुकत असल्याची स्पष्टोक्ती आमदार बच्चू कडू यांनी दिली. तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती केली. हे काम आधी केले असते तर आम्ही कुठेच गेलो नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor