Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठी बातमी, ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान मिळणार

Big news
, शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (21:35 IST)
शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. शेतक-यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
 
या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतक-यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतक-यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे.
 
सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतक-यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतक-यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतक-यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवविवाहित महिलेवर संशय, करायाला लावली कौमार्य चाचणी, पोलीसात गुन्हा दाखल