माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हणत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल आहे.
एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका किंवा टिप्पणी करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणाबद्दल बोलतात त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेने त्यांच्यावर आरोप लावल्यावर मी स्वत: कमिटी तयार करुन १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. १२ तासात खडसेंना त्यात क्लीन चीट मिळाली. भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं, कित्येक दिवस तो जेलमध्ये होता. त्या क्लीन चीटलाही ते ड्राय क्लिनर वैगेरे म्हणत असतील तर माहिती नाही”.
“त्यांना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत: बैठकी घेतल्या आणि निधी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मी स्वत: त्यात न्यायाधीशांची कमिटी तयार केली. त्याचा रिपोर्ट आला, पण त्याच्या आधीच काही लोक हायकोर्टात गेले. कोर्टाने त्यावेळी गुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केला किंवा आकसेपोटी केला असं नाही. न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला. त्यावेळी त्यांनी मला तात्काळ रिपोर्ट गेला पाहिजे अशी विनंती केली. दोन महिन्यातच आम्ही तो कोर्टात सादर केला. पण कोर्टाने स्वीकारला नाही. तो प्रलंबित असून मान्य झाला नाही. यामुळे उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.