कोकणातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये दापोली, मंडणगड नगरपंचायत, ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत आणि रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा समावेश होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. त्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्गात नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ येथे कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुडाळ नगरपंचायतमध्ये सत्ता कोणाची येईल, याबाबत आपण आता बोलू शकत नाही, असं स्पष्ट केले. तसेच कुडाळ नागरपंचायतीत शिवसेनेने प्रचारात पालकमंत्री आणि खासदार यांना आणलं. पण तरीही शिवसेनेचा पराभव झाला. या पराभवाला खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.
“उपमुख्यमंत्री अजित पवार, सतेज पाटील येऊन गेले. पालकमंत्री, खासदार आमदार यांच्याविरोधात आपण लढलो. हा पराभव आमचा नसून सत्ताधाऱ्यांचा आहे. एवढं सगळं साम्राज्य असूनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. हे प्रत्येक निवडणुकीत स्पष्ट होत आहे,” असे निलेश राणे म्हणाले.
“धनजंय मुंडेंचे कुठे काय काय ठेवले आहे हे त्यांनाच माहिती नाही. संपूर्ण राज्यात भाजपाचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. असे निलेश राणे यांनी म्हटले.
“ठाकरे कुठे आहेत हे मला शोधून दाखवा. आज सत्ता तुमची आहे तर उद्या आमची सत्ता असेल. आम्ही तर दया मायाही करत नाही. म्हणून आम्ही उद्या सत्तेवर बसल्यावर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा,” असा इशारा निलेश राणे यांनी दिला.