अगदी 10 महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केली होती. भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांना रोहित पाटील यांनी दणका दिला होता. मात्र, अवघ्या 10 महिन्यात संजय पाटील यांच्या गटाकडून रोहित पाटील गटाला धोबीपछाड दिल्याने कवठेमहाकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान दोन्ही गटातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली.
दहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने एकादी सत्ता मिळवली होती.
मात्र, दहा महिन्याच्या आतच खासदार संजय पाटील यांनी कवठेमंकाळ नगरपंचायतमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या आहेत.
संजय गटाच्या सिंधुताई गावडे आणि रोहित पाटील गटाचे उमेदवार राहुल जगताप यांना प्रत्येकी आठ मत मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी चिठ्ठीवर मतदान घेतलं. यामध्ये संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या.
Published By- Priya Dixit