Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सॅनिटायझरच्या भडक्याने विवाहितेचा मृत्यू

सॅनिटायझरच्या भडक्याने विवाहितेचा मृत्यू
, सोमवार, 27 जुलै 2020 (16:36 IST)
नाशिक शहरातील वडाळागावातील महेबुबनगरमध्ये पत्र्याच्या शेडवजा घरात राहणाऱ्या एक विवाहिता रात्रीच्या सुमारास घरात सॅनिटायझेशन करत होती. यावेळी मेणबत्तीच्या ज्वालेसोबत सॅनिटायझरचा संपर्क होऊन भडका उडाला. या भडक्यात विवाहिता सुमारे ९० टक्क्यांपर्यंत भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रजबीया शाहीद शेख (२४) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने महेबुबनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
कोरोनापासून संरक्षण म्हणून मागील चार महिन्यांपासून निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर घराघरांत केला जात आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत लहान बाटलीदेखील बाळगताना दिसून येत आहे. सॅनिटायझरचा अतिरेकी वापरदेखील धोकादायक ठरत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला आहे. वारंवार सॅनिटायझरचा वापर आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा ठरतो.
 
महेबुबनगरमध्ये गरीब नवाज मशिदीच्या शेजारी असलेल्या एका चाळीत रजबीया ही विवाहिता पती शाहीद मुलगी अक्सा (३), महेजबीन (६) यांच्यासोबत राहत होती. शाहीद मिळेल ते मोलमोजुरीची कामे करत उदरनिर्वाह करतात तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून रजबीयादेखील लोकांची धुणी-भांडीची कामे करून आपल्या दोन मुलींसह संसाराचा गाडा ओढत होती. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शाहीद यांचे कुटुंब येथील एका पत्र्याच्या शेडवजा घरात राहत होते. कोरोनापासून संरक्षणासाठी  रात्रीच्या सुमारास ११ वाजता घरात सॅनिटायझर फवारले. यावेळी वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरामध्ये मेणबत्ती पेटविण्यात आलेली होती. सॅनिटायझरचा मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्याने आगीचा भडका उडाला. या भडक्यात रजबीयाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने जोरजोरात ओरडत घराबाहेर धाव घेतली असता तत्काळ पती शाहीद व आजुबाजुच्या महिलांनी धाव घेत तिला विझविण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत विवाहिता गंभीररित्या भाजल्याने तिला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.२४) रजबीयाचे निधन झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राणे करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात, पण त्यांना गाड्या आम्ही पुरवतो – संजय राऊत