मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ गोंडे ते वडपे आणी वडपे ते ठाणे या रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत मंत्री श्री.भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नाशिकचे जनरल मॅनेजर बी.एस.साळुंखे, वाहतूक मॅनेंजर डी.आर.पटेल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता आर.ए.डोंगरे, मुंबई नाशिक एक्सप्रेसवे लिमिटेडचे जनरल मॅनेंजर ए.एस.सुमेश,श्रीमती वसुंधरा या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. वडपे ते ठाणे या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तत्काळ गती द्यावी. वारंवार खराब होणा-या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. जेणेकरून वाहतूक सुरळीत सुरू राहील. आगामी दहा वर्षात होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे नियोजन देखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आतापासून करावे जेणेकरून या परिसरातून होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन सुयोग्यरित्या करता येईल.
या महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच येणाऱ्या अडचणी आणि समस्यांसाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. या रस्त्यावर खड्डे पडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.