Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eaknath shinde
, शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (08:22 IST)
रत्नागिरी, : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
येथील चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम, शिक्षक महासंघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष अंबादास वाजे उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, जुन्या पेन्शनच्या या मागणीसाठी अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री आणि शिक्षक संघाचे प्रतिनिधी घेऊन राज्यस्तरीय समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणे शासनाची जबाबदारी आहे, त्या निश्चित पूर्ण केल्या जातील.
 
शिक्षकांवर बंधने नकोत. जिथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो. आई-वडिलांनंतर शिक्षकांचेच आदराचे स्थान आहे, या शब्दात शिक्षकांचे कौतुक करुन, मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आज शिक्षकांना फक्त ज्ञानार्जनाचे  काम देणे आवश्यक आहे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी आवर्जून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
भारत तरुणाईचा देश आहे आणि या तरुणाईला घडविण्याचे काम शिक्षक करीत आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झाले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही, शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख करीत शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ग्रोथ इंजिनच आहे. त्यामुळे शिक्षक सर्वश्रेष्ठच आहे, असे सांगून राज्य शासनाने घेतलेले सर्व निर्णय सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून घेतले, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.
 
महसूलमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा पाया अतिशय समर्पित भावनेने शिक्षक करीत आहेत. खूप चांगले शिक्षण देऊन चांगल्या पदांवर आज मुले काम करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न एकत्र बसून सोडविण्याची भूमिका उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
 
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील असून ते अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत.  जुन्या पेन्शनची मागणी सर्वत्र होत आहे.
 
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा आहे. मुख्यमंत्री  श्री.शिंदे यांनी शिक्षणविषयक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. माध्यमिक शिक्षकांसह प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. शिक्षक सुद्धा शिक्षण खात्यात मोठे अधिकारी व्हावेत, अशी राज्य शासनाची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. केंद्र प्रमुखांच्या जागा 100 टक्के भरल्या जातील  तसेच  राज्य शासन पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार आहे, असे ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन