Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री तातडीने नाशिक दौऱ्यावर, शेतकऱ्यांना दिला धीर,गारपीटग्रस्त गावांना दिल्या भेटी,तातडीने पंचनामे करण्याचा दिला आदेश

मुख्यमंत्री तातडीने नाशिक दौऱ्यावर, शेतकऱ्यांना दिला धीर,गारपीटग्रस्त गावांना दिल्या भेटी,तातडीने पंचनामे करण्याचा दिला आदेश
, सोमवार, 10 एप्रिल 2023 (20:57 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी अचानकपणे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे हे सहकारी मंत्र्यांसह उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला गेले होते. मात्र, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू असताना संपूर्ण मंत्रिमंडळ देवदर्शनाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका झाली. रविवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपीट यामुळे राज्याच्या अनेक भागात शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्याशिवाय द्राक्ष, डाळींब या फळबागाही उद्धवस्त झाल्या आहेत. राज्यभरातूनच यासंदर्भात चिंता व्यक्त होत आहे. अखेर त्याची दखल घेत मुंबईमध्ये परतलेल्या शिंदे यांनी तातडीने नाशिक दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील गावांचा  दौरा केला. मुंबईहून थेट सटाणा येथे हेलिकॉप्टरने आले.
 
बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.
 
बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी  बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
 
अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस  आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये नाशिकच्या निफाड परिसरात असलेल्या द्राक्षबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. उत्तम दर्जाचा द्राक्ष बाग मागील पावसात कसाबसा वाचवलेला असतांना नुकत्याच पावसात भुईसपाट झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बाग उन्मळून पडले आहे. यामध्ये द्राक्षबाग विशेष म्हणजे काढणीला आलेला असतानाच नुकसान झाले आहे. बहुतांशी ठिकाणी कांदे काढणीला आले होते. त्यात कांद्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी कांदे काढून त्याची साठवण शेतात केलेली असतांना संपूर्ण कांदा भिजून गेला आहे. यासोबतच मका, बाजरी, गहू ही पिके संपूर्ण जमीनदोस्त झाली आहेत.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनचा तैवान सीमेजवळ युद्धसराव; लोक म्हणतात, 'आता हे नेहमीचंच झालंय'