निसर्ग चक्रीवादळ आज अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून व गुरुवार ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये व उद्योग बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. दोन दिवस घरातच सुरक्षित थांबण्याचे आवाहनही त्यांनी केले.
करोनाच्या टाळेबंदीतून बुधवारपासून शिथिलता देण्यात येणार होती. ‘पुन:श्च हरिओम’ करायचे आपण ठरवले होते. मात्र आता निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी अलिबागच्या जवळपास महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. १०० ते १२५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहणार आहेत. मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिल्याने बुधवारी ३ व गुरुवारी ४ जून रोजी नागरिकांनी घरातच थांबावे. हे दोन्ही दिवस मुंबई व कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यंमध्ये खासगी—सरकारी कार्यालये आणि उद्योग बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सरकारी यंत्रणेतील कर्मचारी कामावर असतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.