हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.
“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असा कायदा करु असं आश्वासनही दिलं.