काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आलेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशातील अनेक काँग्रेसच्या जेष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. राहुल यांचा राजीनामा पक्षाने अजूनही स्वीकारला नसला तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा पटोले यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसला आलेले अपयशाची जवाबदारी सामूहिक आहे. त्यामुळेच मी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व संघटन बरखास्त करत आहे. तसेच, राहुल गांधींच्या समर्थनार्थ यापुढे काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचंही पटोले यांनी म्हटले आहे.