१५ ते १९ जानेवारीला दावोस येथे होणा-या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५० जणांचे शिष्टमंडळ घेऊन चालले असून यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह केवळ १० जणांचे शिष्टमंडळ जाणे अपेक्षित असताना मुख्यमंत्री ५० लोकांचे व-हाड घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौ-यावर आरोप केला. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी केवळ २८ तासांचा दाव्होस दौरा केला होता; पण त्या दौ-यावर तब्बल ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता पुन्हा दावोसचा दौरा करण्यात येत आहे. या दौ-याला १० जण जाणार असल्याची माहिती होती. त्या प्रमाणे त्यांची परवानगीसुद्धा घेण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांनीसुद्धा केवळ दौ-यातील १० लोकांना याची परवानगी दिली होती. आता मात्र या दौ-यात ५० जण जाणार आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या दौ-यामध्ये सध्याचे खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्ण टीम, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कोणीही उद्योजक अथवा व्यावसायिक नाहीत. सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत. इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ज्यांना गुवाहाटीला नेले नाही त्यांना दाव्होसला घेऊन जात आहात का ? असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
मागच्या दौ-यातील उधळपट्टी
दावोस दौ-यासाठी गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. दावोस शिष्टमंडळात सहभागी सदस्यांचा व्हिजा, विमान प्रवास, दावोस येथील स्थानिक प्रवास, सुरक्षा यासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात आली होती मात्र त्यापेक्षा दुप्पट खर्च करण्यात आला होता.
१) मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाच्या प्रवासासाठी ७,२७,३२,४०१ रुपये.
२) महाराष्ट्र पॅव्हेलियनसाठी १६,३०,४१,८२० रुपये.
३) प्रसिद्धी आणि जाहिरातींसाठी १,६२,९२,६३०.
४) आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीसाठी २,००,५०,००० रुपये.
५) भेटवस्तू आणि इतर साहित्य ६,३०,४३६ रुपये.
६) सुरक्षेसाठी ६०,४२,६३१ रुपये.
७) चार्टर्ड विमानासाठी १,८९,८७,१३५ रुपये.
८) फोटो आणि व्हीडीओग्राफीसाठी ६१,२३,००० रुपये.
९) स्टेट डिनरसाठी १,९२,६७,३३० रुपये.
एकूण ३२ कोटी ३१ लाख ७६ हजार ४६३ रुपये खर्च दाव्होस दौ-यावर करण्यात आला होता. यंदा ४ दिवसांच्या दावोस परिषदेसाठी ३४ कोटींची तरदूत करण्यात आली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Edited By - Ratnadeep ranshoor