Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अमरावती जिल्ह्यात संचारबंदीतील निर्बंध आणखी कडक

अमरावती जिल्ह्यात संचारबंदीतील निर्बंध आणखी कडक
, शनिवार, 8 मे 2021 (09:54 IST)
अमरावती जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता संपूर्ण जिल्ह्यात ९ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
 
आदेशानुसार, *कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.* सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान करता येईल.
 
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहील. *कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही.* तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
 
सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील.
 
पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु राहील.
 
*बांधावर निविष्ठा पोहोचवा*
कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि, शेतक-यांना आवश्यक त्या वस्तूचा पुरवठा घरापर्यंत, तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषीसेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील. या प्रक्रियेचे नियोजन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी करण्याचे निर्देश आहेत.
 
*हे राहणार संपूर्ण बंद*
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण चालू राहील, मात्र त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिका-यांवर आहे.
 
*हे राहणार सुरू*
सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु ठेवता येईल. चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.
 
*लग्नाला केवळ 15 व्यक्ती*
सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ 15 व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा 2 तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याची असेल.
 
*परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल*
परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल. तसे आदेश पेट्रोलपंपधारकांना देण्यात आले आहेत. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल, डिझेल यांची उपलब्धता करून देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी रोज अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.
 
गॅस एजन्सीज मार्फत गॅस सिलेंडरचे वितरण व्हावे मात्र, ग्राहकांनी गॅस एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलेंडर घेऊ नये. याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
 
*कार्यालयेही बंद, ऑनलाईन कामे करण्याचे आदेश*
सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडित सर्व कार्यालये यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना ऑनलाईन कामकाज करता येईल. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील जसे की महसूल विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, महापालिका आदी. शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही.
 
*अभ्यागतांना प्रवेश नाही*
सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत. अतिआवश्यक कामांसाठी संवाद कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर (ई-संवाद टोल फ्री क्रमांक 1800 233 6396) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
*बँका, पोस्टही दुपारपर्यंत सुरू*
सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत.
 
*सेतू केंद्र, दस्त नोंदणी बंद*
सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील.
 
एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ मूलस्थानी पद्धतीने ( *In-situ*) कामकाज सुरु राहील. याबाबतची जबाबदारी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिका-यांची असेल.
 
*ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील.* स्थानिक दुकानदार, हॉटेलामार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत संनियंत्रण करतील. कर्मचा-यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 
सर्व सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. रूग्णांसाठी रिक्षा व खासगी वाहनास परवानगी राहील. तसे नियंत्रण वाहतूक पोलीसांनी ठेवण्याचे आदेश आहेत.
 
मालवाहतूक व रुग्णवाहतूक करणा-या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. मात्र, मालवाहतूक साठा, खत साठा आदींबाबत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे. इतर कारणांसाठी व आवश्यक वैद्यकीय कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरून ई-पास काढून वाहतूक करता येईल.
 
या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात आयुक्त, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, तसेच ग्रामीण भागात गटविकास अधिका-यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रणासाठी इंसिडेंट कमांडर म्हणून तहसीलदार व पोलीस विभागाकडे जबाबदारी आहे.
 
*विशेष परवानगी कुणालाही नाही*
*हे आदेश सर्व आस्थापनांसाठी असून, कोणत्याही क्षेत्रात कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी नाही. विशेष परवानगी 15 मेपर्यंत कोणालाही मिळणार नाही. सर्वांनी दक्षता त्रिसूत्रीचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र..