राज्यात ओमॅक्रोनमुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णनाची संख्या कमीच आहे. यावर जिल्हा प्रशासन कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान,जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा एक टक्क्याच्या आत असून तो दर पाच टक्क्यांवर गेल्यास किंवा त्यापूर्वीही कोरोना संसर्गाचा धोका वाढल्यास शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
राज्यात सध्या ओमॅक्रोनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. मुंबईसह पुण्यात सार्वधिक रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्यातील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे विद्यापीठांमधील शिक्षण व परीक्षांबाबतच्या तयारीबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. त्यास जिल्ह्यातून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन व जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते. उच्च तंत्र शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. विद्यापीठ ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण व परीक्षा घेऊ शकते. सातपुडा पर्वतरांगांमुळे नंदुरबार जिल्ह्यात कनेक्टिव्हिटीची अडचण येत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
तूर्तास शाळा बंद करण्याचा निर्णय नाही
गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात शून्य, दोन, तीन, नऊ, सोमवारी १६ व मंगळवारी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून आली. एखाद्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात रुग्ण येत असल्यास, पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांवर गेल्यास शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यापूर्वीही कोरोनाचा धोका वाढल्यास शाळा बंद करण्याचा विचार करण्यात येईल. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्याच्या खाली आहे. त्यामुळे तूर्तास शाळा बंद होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.