कापड बाजारातील एम. जी. रोड, मोचीगल्ली, शहाजीरोड परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे मनपाने या परिसरातील अतिक्रमणे काढून आपली स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, घडलेली घटना पहिल्यांदाच घडली असे नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार या भागात घडत असतात. मनपा प्रत्येक वेळी कारवाईचा दिखावा करते.
मनपाने या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी न हटवल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात काम करू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
बाजारपेठेत एखादी घटना घडली की, जुजबी कारवाई करायची आणि पुन्हा जैसे थे चालूच, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. मागील काळात सुद्धा या भागातील व्यापारी बांधवांनी वारंवार आंदोने करून याकडे लक्ष वेधले. परंतु मनपा प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.
या परिसरात महिला, मुलींची होणारी छेडछाड नित्याची बाब झाली असून या अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून भविष्यात जातीय दंगल घडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या भागातील अतिक्रमाणे कायमस्वरुपी हटवण्यात यावी, अन्यथा मनसे आपल्याला कार्यालयात काम करू देणार नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला. दरम्यान, फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांचे जगणे कठीण केलेले आहे.