Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अण्णासाहेब मोरे यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीने थेट खुले आव्हान

अण्णासाहेब मोरे यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीने थेट खुले आव्हान
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (20:53 IST)
नाशिकमधील दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीने थेट खुले आव्हान दिले आहे. चमत्कार सिद्ध करा व एकवीस लाख रुपये जिंका, अशा स्वरुपाचे हे आव्हान आहे. कोणत्याही वयातील सज्ञान किंवा अज्ञान मुलांच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर ४४८२४९०२ हा अंक लिहिल्याने, त्यांच्यातील मोबाईलचे व्यसन दूर होते, असा दावा अण्णासाहेब मोरे यांनी केल्याचे अंनिसने म्हटले आहे. त्याचाच आधार घेत अंनिसचे हे आव्हान स्विकारावे, असे अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जात पंचायतीला मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणिअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. समीर शिंदे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अंनिसने अण्णासाहेब मोरे यांना पत्रही दिले आहे.
 
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, आम्ही महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आव्हानपत्राद्वारे आपणांस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नम्र आव्हान देतो की, एका व्हिडिओ क्लिपमध्ये आपण असा दावा केला आहे की , ” मुलांमध्ये मोबाईलचे २४ तास व्यसन आहे. त्यांच्यासाठी ४४८२४९०२ हा नंबर आलेला आहे. हा अंक हिरव्या पेनने म्हणजेच हिरव्या शाईने कोणत्याही वयाच्या सज्ञान किंवा अज्ञान मुलाच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर तो मराठीतून लिहावा . हा अंक लिहिला की त्यांचे लक्ष योग्य दिशेला जाईल. ”
 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे असे म्हणणे आहे की, आपल्या ह्या अजब-अवैज्ञानिक दाव्यामुळे, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013’या कायद्यातील काही तरतुदींचे सर्रास उल्लंघन घडत आहे. कारण अंकांमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे. हा अंक कोणत्याही वयाच्या मुलांच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर लिहावा. त्यातून चमत्कार घडेल आणि त्यांचे लक्ष योग्य दिशेला जाईल, असा आपला दावा आहे. असा अर्थ आपल्या ह्या दाव्यातून स्पष्ट होतो आहे.

भारतीय राज्यघटनेतील श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचा महाराष्ट्र अंनिस आदर करते. शिवाय कोणत्याही व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रीय उपायांचा, उपचारांचा अवलंब उपकारक ठरतो,असाही अंनिसचा ठाम विश्वास आहे.
 
मात्र आपला हा अजब -अवैज्ञानिक दावा,लोकांना चमत्कारांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारा आहे. अशा अवैज्ञानिक आणि लोकांची दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या गोष्टींची जाहिरात आपण प्रसारमाध्यमांतून करीत आहात. आपल्या या तथाकथित चमत्कारांचा प्रचार,आणि प्रसार करून , लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा आपला हेतू आहे, हे स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे स्पष्ट व ठाम मत आहे. म्हणून आपण केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने, संघटनेने उपस्थित केलेल्या पुढील प्रश्नांची सिद्धता , वैज्ञानिक कसोट्या वापरून आणि संघटनेच्या आव्हान प्रक्रियेतील अटी, नियम, शर्तींचे पालन करून आपण आपला दावा सिद्ध करावा, असे जाहीर आव्हान आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आपणांस देत आहोत.
 
आपल्या दाव्याच्या अनुषंगाने आपणास सिद्ध करावे लागणारे काही प्रश्न,पुढील प्रमाणे :
१] मुलांमधील २४ तास असलेले मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी ४४८२४९०२ हा अंक आला आहे, असे आपण बोलताना म्हटलेले आहे.
तर मग हाच अंक का व कुठून आला आहे ,याचे उत्तर आपण द्यावे.
२] कोणत्याही वयाच्या सज्ञान किंवा अज्ञान मुलाच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर हाच अंक का लिहावा ? याचे उत्तर वैज्ञानिक कसोटी वापरून सिद्ध करावे.
३] ह्या अंकात अशी कोणती दैवी शक्ती आहे, चमत्कार आहे, की ज्याच्यामुळे त्या मुलाचे मोबाईलचे व्यसन दूर होऊन ,त्याचे लक्ष योग्य दिशेला जाईल ,हे आपण कोणत्या वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे सांगत आहात, त्याचा पडताळा द्यावा.
४] हा अंक हिरव्या पेनने म्हणजेच हिरव्या शाईनेच आणि मराठीतूनच लिहावा, असे आपण का व कोणत्या वैज्ञानिक कसोटीच्या आधारे सांगत आहात ? ते सिद्ध करावे.
 
प्रसार माध्यमातून फिरत असलेल्या आपल्या उपरोक्त दाव्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वरील आव्हानात्मक प्रश्न आपणास जाहीरपणे आम्ही उपस्थित करीत आहोत. जर आपण आपला दावा सिद्ध केला तर महाराष्ट्र अंनिसने आव्हान सिद्ध करण्यासाठी ठेवलेली 21 लाखाची रक्कम पारितोषिक म्हणून आपण जिंकाल, असेही आम्ही आपल्याला आश्वासित करतो.
 
वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे आणि महाराष्ट्र अंनिसच्या आव्हानप्रक्रियेच्या अटी, शर्ती, नियमांचे पालन करून, ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता आपली आहे. म्हणून महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान आपण स्वीकारत असल्याचे लेखी पत्र आपण, ह्या लेटरहेडवर, वरच्या बाजूला असलेल्या संघटनेच्या कार्याध्यक्षांच्या पत्त्यावर पुढील दहा दिवसात ई-मेलने तसेच रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची तसदी घ्याल ,अशी अपेक्षा आहे. वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे आपण आपला सदर दावा सिद्ध करू शकत नसाल तर,” सदर दावा आम्ही सिद्ध करू शकत नाही त्यातून माघार घेतो,” असेही आपण लेखी पत्राद्वारे पुढील दहा दिवसात संघटनेला कळवावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्तशृंग गड मंदिर परिसरात कोरोनाचे निर्बंध लागू