राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देत धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभं आहे असं देखील ते म्हणाले. दक्षिण सोलापूर तालुक्यात रामपूर येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ठाकरे यांनी गावक-यांशी संवाद साधला. यावेळी संकटग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांच्या मदतीचे धनादेश ठाकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संवाद साधताना गावक-यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना धीर देत म्हणाले. राज्यावर आलेल्या आपत्तीचं संकट फार मोठं आहे. राज्यात २२ ते २४ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. अता अतिवृष्टी होवू नये हिच प्रार्थना. पण जी काही मदत करायची आहे, त्यामध्ये सरकार कोठेही मागे राहणार नाही असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं.
त्याचप्रमाणे किती नुकसान झालंय याचं पंचनामे सुरू आहेत, माहिती घेतली जात असून लगेचच मदत जाहिर करू. गरज पडल्यास केंद्राकडे मदत मागू, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.