नागपूर : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना आज पितृशोक झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ९१ वर्षाचे होते. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी समर्थपणे सांभाळल्या. १९६७ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे पार्थिव शनिवार ४ जून रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्यात येईल. त्यांची अंत्ययात्रा सायं. ४.३० वा. त्यांच्या कस्तुरबा चौक निवासस्थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.