डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड प्रकरणात संशयित पती संदीप वाजे याचा साथीदार बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हसके यास तपासी पथकाने गजाआड केले आहे. त्यास आज (ता.१७) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, संशयित संदीप वाजे याची पोलिस कोठडी काल (दि. १६) संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मोरवाडी (नाशिक) मनपा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड प्रकरणात संशयित आरोपी पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. संदीप वाजे यास न्यायालयाने एकूण १३ दिवस पोलिस कोठडी दिली. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, तपासी अधिकारी निरीक्षक अनिल पवार व पथकाने महत्वपूर्ण धागेदोरे मिळवित तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयित वाजेचा साथीदार यशवंत म्हस्के यास बुधवारी (ता.१६) अटक केली.
आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, संशयित संदीप वाजे यास इगतपुरी न्यायालयात हजर केले. अॅड. दिलीप खातळे यांनी संशयित आरोपीच्या वतीने बाजू मांडताना पोलिस कोठडी दोन- तीन नव्हे तर १३ दिवस देण्यात आली आहे. यामुळे आता पोलिस कोठडी देणे उचित नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत संशयित वाजे यास न्यायालयीन कोठडी सुनावली.