Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डॉ. तात्याराव लहाने : आईच्या किडनीमुळे जीवदान, मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम ते शस्त्रक्रिया चोरल्याचे आरोप

डॉ. तात्याराव लहाने : आईच्या किडनीमुळे जीवदान, मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम ते शस्त्रक्रिया चोरल्याचे आरोप
, रविवार, 4 जून 2023 (14:05 IST)
facebook
'माझा आणि जे जे चा संबंध संपला, आता माघारी फिरणार नाही' असं म्हणत आपण राजीनाम्यावर ठाम असल्याची घोषणा मुंबईच्या जेजे रुग्णालयाचे सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केली आणि सगळीकडे खळबळ उडाली.
 
नेत्र विभागात दैदिप्यमान कामगिरी करणारे, मोतीबिंदू ऑपरेशन्सचे अनेक विक्रम आपल्या नावावर करणारे डॉ. तात्याराव लहाने हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.
 
जे जे रुग्णालय हे राज्यातील एक नामांकित सरकारी रुग्णालय आहे. राज्यभरातून रुग्ण इथे उपचारासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून नेत्रविकार विभागात काम करणाऱ्या 28 निवासी डाॅक्टरांनी डाॅ. लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ डाॅक्टरांविरोधात तक्रारी केल्या.
 
नेत्रविकार विभागात डॉक्टर, प्राध्यापक, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देत असून त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी करत निवासी डॉक्टर्सनी काम बंद आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाचा रोख डॉ. तात्याराव लहाने यांच्यावरच होता. त्यांनी राजीनामा दिला तरी हा वाद अजून थांबलेला नाही.
 
हुकुमशाहीचा आरोप होणारे वादाच्या केंद्रस्थानी सापडलेले तात्याराव लहाने नेमके आहेत तरी कोण?
 
डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता. एक लाखांहून जास्त नेत्रशस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम नोंदवणारे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रशल्यविशारद मूळचे लातूरचे. लातूर जिल्ह्यातील मकेगाव हे त्यांचं जन्मगाव.
15 फेब्रुवारी 2020 रोजी एबीपी माझा वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत तात्याराव सांगतात, "घरी प्रचंड गरिबी होती. नऊ जणांचं कुटुंब शेतीवर अवलंबून होतं, सगळे जण शेतीतच खपायचे. 1957 साली गावात एक खासगी शाळा निघाली तेव्हा मी सात-आठ वर्षांचा असेन. शाळा सुरू करायला वीस-तीस मुलं हजेरीपटावर असणं आवश्यक असतं, म्हणून माझी रवानगी शाळेत झाली."
 
जन्मतारीख माहीत नव्हती म्हणून मास्तरांनीच 24 जून अशी नोंद केली. शाळेत नाव घातलं तरी शेतीची, घरची कामं होतीच. त्यामुळे तात्याराव वेळ मिळेल तेव्हा शाळेत जात. एरवी पूर्णवेळ गुरं राखणं, शेतात काम करणं किंवा पाझर तलाव खणणं ही कामं. मात्र शाळा अनियमित असूनसुद्धा तात्याराव चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यातून पहिले आले.
 
हा मुलगा खूप हुशार आहे, हे मास्तरांना कळलं. चौथी झाली, आता शाळा पुरे, असं तात्यारावांच्या वडिलांना वाटत होतं. पण मास्तरांच्या आग्रहापुढे त्यांचा विरोध टिकला नाही. तात्यारावांच शिक्षण पुढे सुरूच राहिलं.
 
मॅट्रिकच्या परीक्षेत तात्याराव बोर्डात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तात्यारावांच्या वडिलांना म्हणाले, 'तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला सायन्सला घाला. इथे गावात ठेवू नका.' हेडमास्तरांना नाही कसं म्हणणार? तात्यारावांनी सायन्सला प्रवेश घेतला.
 
तात्याराव मुलाखतीत पुढे सांगतात, "त्या काळी ग्रामीण भागात परिस्थिती खूप वाईट होती. आता तरी सगळीकडे शाळा आहेत, मास्तर थोडंफार शिकवतात, मुलं शिकतात. पण आमच्यावेळी सगळ्याच बाबतीत खूप अज्ञान होतं. मी वडिलांबरोबर जाऊन शहरात कॉलेजला प्रवेश घेतला."
 
"आमच्या विज्ञान महाविद्यालयात वीस मुलांची एक वेगळी बॅच असायची. मेडिकलला जाण्यासाठी या मुलांकडून विशेष तयारी करून घ्यायचे. मला या बॅच मध्ये जायचं होतं कारण या मुलांना होस्टेल, जेवण, पुस्तकं, गणवेश सगळं फुकट असायचं. फक्त कॉलेजची फी तेवढी भरायची. माझ्याकडे पैसे नसल्यानं या तुकडीत जाता आलं तर काळजी मिटेल, असं वाटत होतं. मला मार्क चांगले होते, मी बोर्डात आलो होतो. त्यामुळे माझी निवड होईलच, याची मला खात्री होती."
 
"पहिल्याच दिवशी या तुकडीसाठी निवडचाचणी होती. मला एका शिक्षकांनी एक इंग्रजी परिच्छेद वाचायला दिला. मी वाचायला सुरुवात केली. दुसर्‍या की तिसर्‍या ओळीतच stomach असा शब्द आला. आता आमच्या शाळेचे गुरुजी या शब्दाचा उच्चार स्टमच असा करायचे. मीसुद्धा तसाच उच्चार केला. त्याबरोबर ते कॉलेजातले शिक्षक भडकले. हा मुलगा गावरान आहे. कसा मेरिटला आला कोण जाणे, असं म्हणून मला हाकलून दिलं."
कॉलेजला असताना एका शिक्षकांनी तात्यारावांना 'कमवा आणि शिका' योजनेची माहिती दिली. कॉलेजातल्या बागेतल्या शंभर झाडांना रोज पाणी घालायचं काम होतं. प्रत्येक झाडाला एक घागर पाणी घालायचं. विहीर अर्धा किलोमीटर लांब. या कामाचे महिन्याला तीन रुपये मिळत.
 
काबाडकष्ट करतच तात्यारावांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. मुलाखतीत तात्याराव सांगतात, "याच दरम्यान मेडिकलची प्रवेश परीक्षा झाली होती. आता प्रवेश मिळतो की नाही, याची फार मोठी चिंता होती. मी ज्यांच्या खोलीत भाड्यानं राहायचो त्यांची मुलगी लग्नाची होती. मी तुमच्या मुलीशी लग्न करतो, माझं पुढचं शिक्षण तुम्ही करा असं त्यांना म्हटलं. त्यांनीही लगेच होकार दिला. पण घरची परिस्थिती बघून त्यांनी मुलगी काही दिलीच नाही."
 
मेडिकलच्या परीक्षेत तात्याराव मराठवाड्यातून दहावे आले होते. मेडिकलला प्रवेश मिळाला. शेत गहाण टाकून हजार रुपये मिळाले. त्यातले सातशे रुपये फी म्हणून भरले. आणि मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं.
 
आमदारांच्या घरचं स्थळ...
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तात्यारावांचं लग्न बीडचे आमदार असलेल्या रघुनाथराव मुंडे यांच्या मुलीशी ठरलं. खरं म्हणजे आपल्यासारख्या हाती काहीही नसलेल्या मुलाशी रघुनाथराव आपल्या मुलीचं लग्न का लावून देत आहेत, हा प्रश्न तात्यारावांना पडला होता. पण रघुनाथरावांना तात्यारावांच्या जिद्दीबद्दल, हुशारीबद्दल खात्री होती. लग्न झालं, आणि तात्यारावांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नेत्रशल्यचिकित्सा हा विषय निवडला.
आमदार रघुनाथराव मुंडे हे तेव्हाचं बडं प्रस्थ. बीड मधील रेणापूर मतदारसंघातून 1972 ते 1980 असे दोन टर्म ते विधानसभेचे आमदार होते.
 
लहाने सांगतात, मला पदव्युत्तर शिक्षणासाठी बालचिकित्सक हा विषय हवा होता. पण त्या वर्षी या विषयासाठी विद्यावेतन मिळणार नव्हतं पण मला पैशाची निकड होती. नाइलाजास्तव मग मी नेत्रशल्यचिकित्सा या विषयाकडे वळलो.
 
डॉ. लहाने त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये आपल्या पत्नीविषयी लिहितात की, "17 मे रोजी माझी पत्नी सौ. सुलोचना हिचा वाढदिवस. तिचं लहानपण श्रीमंतीत गेलं. कारण ती आमदार रघुनाथराव मुंडे यांची एकुलती एक मुलगी. पण माझ्या घरी आल्यानंतर तिने सर्व कामे केली. माझ्या बहीण भावांना घरी ठेवून त्यांचं शिक्षण केलं. बहीणीची, भावाची व पुतण्यांची लग्नं अपार मेहनत व हसतमुखाने पार पाडली. लहाने कुटुंबावर स्वत:च्या कामाचा व प्रेमाचा ठसा ऊमटविला."
 
किडनीचा आजार आणि नवा जन्म
1 जुलै 2021 रोजी 36 वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. आपल्या 36 वर्षांच्या सेवेत त्यांनी एकुण 1 लाख 62 हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. 2008 मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आलं.
 
आपल्या सेवानिवृत्तीची माहिती देताना त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला होता.
 
ते पत्रात लिहितात, '17 मे 1985 रोजी मी अधिव्याखाता म्हणून अंबाजोगाई बीड येथे सेवेत रूजू झालो होतो. अंबाजोगाई येथे असतानाच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मी नेत्रशिबिरांना सुरुवात केली होती. बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांत जाऊन अंधत्व आलेल्यांना दृष्टी देण्याचे काम आठ वर्ष केलं."
 
"त्यानंतर धुळे येथील नवीनच स्थापित झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्टोबर 1993 ते जुलै 1994 असे नऊ महिने काम केले. तेथेही आदिवासी व दुर्गम भागांत जाऊन नेत्रशस्त्रक्रिया केल्या. पण किडनीचा आजार बळावल्याने मी मुंबई येथे सर जेजे रुग्णालयात जुलै 1994 ला रूजू झालो."
 
"दर गुरूवारी माझे डायलिसीस सुरू झाले. मी येथे आल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेण्यास सुरुवात केली. पुढे माझा किडनीचा आजार बळावला. किडनी बदलावी लागणार होती. माझी आई (माय) अंजनाबाईने स्वत:ची किडनी देऊन फेब्रुवारी 1995 ला मला दुसरा जन्म दिला. मायीच्या या दातृत्वाने प्रेरीत होऊन मी सामाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला."
 
डॉ. लहाने यांनी जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून काम करत असताना नेत्रशल्यचिकित्साविभाग एक मॉडेल म्हणून विकसित केला. त्यांच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभागानं फार मोठी मजल गाठली.
 
पण आता याच रुग्णालयातील 28 निवासी डाॅक्टरांनी डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप करत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.
 
येथील निवासी डाॅक्टरांचं म्हणणं आहे की, "ते हुकुमशाहीप्रमाणे त्यांचा विभाग चालवतात. तिथे कोणत्याही गाईडलाईन्सचे पालन केले जात नाही. युनीट सिस्टम नाही. बोलताना आमच्याशी, महिला डाॅक्टरांशी आरोपी असल्याप्रमाणे भाषा वापरली जाते."
 
"पुरुष आणि महिला डाॅक्टरांनी अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिवराळ भाषेत त्यांच्याशी बोललं जातं," असाही आरोप निवासी डाॅक्टरांनी केला आहे.
 
"डाॅ. लहाने निवृत्त असूनही जेजेमध्ये येऊन ते शस्त्रक्रिया करतात. तसंच त्यांचा मुलगाही ज्यांना रुग्णालयात कोणतीही पोस्ट नाही ते सुद्धा शस्त्रक्रिया करतात," असंही निवासी डाॅक्टरांचं म्हणणं आहे.
 
ते पुढे सांगतात," डाॅ. लहाने यांना पद्मश्री मिळाला, त्यांच्या नावाने गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड जातोय. पण अशी रेकाॅर्ड सिस्टम सुरू केली तर देशासाठी धोका आहे. मग प्रत्येक विभाग प्रमुख रेकाॅर्डचाच विचार करेल."
 
तसंच लहानेंविरोधातील तक्रारी गेल्या 20-22 वर्षांपासूनच्या आहेत. या विरोधात नेहमी संप होत आलाय, पण राजकीय दबावाखाली संप दाबला जातो. त्यावेळी डाॅ. लहाने स्वतः अधिष्ठाता होते त्यामुळे प्रकरण दाबलं जात होतं, असाही मार्डच्या डाॅक्टरांच्या आरोप आहे.
 
या तक्रारीनंतर या विभागातील 9 वरिष्ठ डाॅक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यात डाॅ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डाॅ. प्रीतम सामंत, डाॅ. शशी कपूर, डाॅ. स्वरंजीत भट्टी, डाॅ. अश्वीन बाफना, डाॅ. दीपक भट, डाॅ. सायली लहाने, डाॅ. हेमालीनी मेहता या डाॅक्टरांचा समावेश आहे.
 
आज शासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. तसंच मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक पदाचा करार समाप्त करण्यात आला आहे.
 
यासंबंधी शासनाने एक परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या वर्षी 13 डिसेंबरला त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांनी जे.जे. चा राजीनामा दिल्यावर हाही करार संपुष्टात आल्याचं शासनाने म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Farrukhabad : मुलाने सापाचा चावा घेतल्याने सापाचा मृत्यू