कोरोनाच्या या बिकट काळात रुग्णांना औषधोपचार, वैद्यकीय सेवा आणि खाता मोफत उपलब्ध करून देण्यासाठी युसुफिया फाउंडेशनने सुद्धा पुढाकार घेतला आहे. या फाउंडेशनकडून अशोका मार्गावरील बगाई बँक्वेट हॉलचे रुपांतर मिनी रुग्णालयात करण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणी डॉक्टरांकडून रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार पूर्णपणे मोफत केले जात आहेत.
या ठिकाणी एकूण २० खाटा पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वडाळागाव, अशोकामार्ग, पखालरोड, काजीनगर, विधातेनगर, हैप्पी होम कॉलनी या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील रुग्णांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय असो किंवा नाशिकरोडचे बिटको रुग्णालय असो.. कुठेही बेड उपलब्ध होत नाहीये. हॉस्पिटल्स फुल झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर सामाजिक भावनेतून युसुफिया फाउंडेशनचे संस्थापक हाजी मुजाहिद शेख आणि संचालक इस्माईल शेख यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या बँक्वेट हॉलचे या मिनी रुग्णालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.
या हॉलमध्ये वीस खाटांसह आवश्यक ते सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या रुग्णालयात केवळ साधा थंडी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांवरच नाही तर कोरोनाबाधित रुग्णांवर देखील उपचार केले जात आहेत. या ठिकाणी छातीरोग तज्ञ डॉ. दिनेश वाघ, डॉ. खालिद अहेमद, डॉ. शब्बीर अहेमद, डॉ. रईस सिद्दिकी, डॉ. ओमेझ शेख हे रुग्णांवर उपचार करत आहेत.
याबद्दल बोलतांना संचालक इस्माईल शेख म्हणतात, “युसुफिया हेल्थ केअर सेंटर हे पूर्णपणे सर्व गरजूंसाठी खुले असून येथून औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरविल्या जात आहेत.
तसेच लवकरच खाटांची संख्या आणि ऑक्सिजन सिलिंडरची संख्या वाढवली जाणार आहे. या सेंटरमध्ये रोज ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत साडेतीन ते चार हजार लोकांना उपचार दिले गेले आहेत. हे सेंटर सर्व नागरिकांसाठी खुले आहे अशी माहिती संचालक हुसेन मुजाहिद शेख यांनी दिली आहे.