राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत देखील सोबत होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लागोपाठ घेतलेल्या दोन भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी भेट घेतल्याने चर्चेला अजूनच उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ही भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. हे तर्कवितर्क सुरू असतानाच फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील घरी सदिच्छा भेट दिली. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी घरी बोलावलं होतं, असं फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, आज एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. खडसे यांनी स्वत: या भेटीबाबत ट्वीट केलं आहे. पवारसाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं खडसे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.