महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिकच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्कम चर्चा झाल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याच बरोबर, आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत ट्विट्ससंदर्भात चर्चाही केली. यावर ते ट्विटर हँडल माझे नाही, असे बोम्मई यांनी म्हटल्याचेही शिंदेंनी सांगितले. तसेच, सर्वांनी मिळून, कुठलेही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिंदे म्हणाले, आज अमित शाह यांनी बैठक बोलावली, या बैठकीला मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात ज्या घटना सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, मराठी भाषेचा सन्मान व्हावा. तसेच मराठी माणसांवर कुठलाही अन्य होऊ नये, अशी भूमिका राज्यसरकारची म्हणजेच आमची होती. त्या चर्चेत, गृहमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही ते मान्य केले आणि दोन्ही राज्यांत शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण रहावे, कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, अशा प्रकारची सूचना केंद्रिय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.
Edited by: Ratnadeep Ranshoor