Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

एकनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती, गेल्या वर्षभरातील 11 मोठ्या घट

eknath shinde
, मंगळवार, 20 जून 2023 (19:32 IST)
Facebook
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालंय.
 
वर्षभरापूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेनं निघाले. सुरतमधून ते गुवाहाटी-गोवामार्गे मुंबईत आले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
 
यादरम्यान उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत गेली. तसंच, सत्तास्थापनेनंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हही शिंदेंना मिळालं. तसंच, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारही स्थिर झालं.
 
या बातमीतून आपण गेल्या वर्षभरात म्हणजे शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर आजपर्यंत कुठल्या मोठ्या घडामोडी घडल्या, याचा आढावा घेणार आहोत.
 
1) शिवसेनेत अभूतपूर्व बंड
19 जून 2022 रोजी शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा झाला आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जानेवारी 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठं बंड झालं.
 
महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी मतदान पार पडल्यानतंर एकनाथ शिंदे 12 आमदार घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले. तिथून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत गेले. तोवर शिंदे गटातल्या आमदारांची संख्या 46 वर पोहोचली. यात एकट्या शिवसेनेतील 40 आमदार होते.
 
दरम्यानच्या काळात शिवसेनेनं उरलेल्या आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.
 
आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास पाटील हेही आधी एकनाथ शिंदेंसोबत अनुक्रमे सुरत आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचले होते. मात्र, खरं कारण लक्षात आल्यानं आपण तिथून परतलो, असं या दोघांनीही नंतर माध्यमांना सांगितलं.
 
पुढे या दोन्ही आमदारांना माध्यमांसमोर आणत एकनाथ शिंदेंनी कशी आपली फसवणूक केली, हे ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं.
 
मात्र, तरीही एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं आणि शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं.
 
2) गुवाहाटीत बसून प्रतोद बदलला
एकनाथ शिंदेंनी बंड करण्याआधी अखंड असलेल्या शिवसेनेचे विधिमंडळात आमदार सुनील प्रभू हे प्रतोद होते.
 
मात्र, एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील गटनेते या नात्यानं गुवाहाटीत बसूनच पत्रक जारी केलं आणि शिवसेनेचे महाड-पोलादपूर (रायगड) चे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली.
 
यावरूनच पुढे म्हणजे 3 जुलै रोजी जेव्हा विधानसभा अध्यक्षपद निवडण्याची वेळ आली, तेव्हा वाद झाला.
 
कारण शिंदे गटानं निवडलेले प्रतोद भरत गोगावलेंनी पत्रक जारी करत, विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनाच शिवसेना आमदारांनी मत द्यावं, असा व्हीप जारी केला, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंनी राजन साळवींना मत देण्यासाठी व्हिप जारी केला.
 
आता कुणाचा व्हीप खरा, कुणाचा खोटा, हा वाद सुरू झाला. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी शिंदेंसह 40 आमदारांनी नार्वेकरांना, तर उर्वरित 15 जणांनी (रमेश लटकेंच्या निधनामुळे ठाकरे गटाची आमदारसंख्या एकनं कमी होती) राजन साळवींना मत दिलं.
 
शिंदे आणि ठाकरे गटानं एकमेकावर व्हीपचं उल्लंघन केल्याचा आरोप केला.
 
हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्यानं अद्याप कुणाचा व्हीप वैध, हेच ठरत नाहीय.
 
दरम्यान, या बंडामुळे महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्रित येत स्थापन केलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
 
3) उद्धव ठाकरेंनी पक्षाची घटना बदलली
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पाच दिवसांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावली.
 
एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेकडून या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव पारित करण्यात आले. यातले तीन ठराव पुढली घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
 
पहिला ठराव म्हणजे, उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत. सद्यस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात येत आहेत.
 
दुसरा ठराव म्हणजे, शिवसेना आणि बाळासाहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या विलग करता येणार नाहीत आणि ते कोणीही करू शकणार नाही म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना पक्षाव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नाही.
 
तिसरा ठराव म्हणजे, शिवसेनेशी बेईमानी करणारे कोणीही असो, कितीही मोठे असो त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार ही राष्ट्रीयकार्यकारिणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना देत आहे. त्यासाठी ही कार्यकारणी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.
 
याच अधिकाराने उद्धव ठाकरेंनी पुढे एकनाथ शिंदेंसह इतर बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.
 
4) एकनाथ शिंदेंकडून नवे पदाधिकारी जाहीर
बंडानंतर उद्धव ठाकरे ज्या ज्या नेत्याची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करत होते, त्या त्या नेत्याला एकनाथ शिंदे पुन्हा पदावर घेत होते.
 
एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला पक्षाचा ‘मुख्यनेते’पद बहाल केलं होतं. त्यामुळे या नात्यानं ते पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या करत होते.
 
उदाहरणार्थ, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंनी ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती आणि त्या ठिकाणी आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची नियुक्ती केली.
 
मात्र, एकनाथ शिंदेंनी नरेश म्हस्केंची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली.
 
याचाच पुढचा भाग शिवसेना शाखांवर दावे करण्याचा सुरू झाला.
 
मुंबई-ठाण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी शिंदे आणि ठाकरे गटानं शिवसेनेच्या शाखांवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या दाव्यांवेळी हिंसक झटापटीही झाल्या.
 
5) उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
बंडानंतर बरोबर दहाव्या दिवशी म्हणजे 29 जून 2022 रोजी रात्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकवर लाईव्ह येत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
 
यावेळी त्यांनी राजीनाम्यामागची सविस्तर भूमिका मांडली आणि नंतर राजीनाम्याची घोषणा केली.
 
त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी राजभवनावर जाऊन राजीनाम्याचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्दही केलं.
 
राजीनामा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली आहे. सरकार म्हणून अनेक कामं केली. बळीराजाला कर्जमुक्त केलं. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले, कारण संभाजीनगर नामकरण केलं. शिवाय उस्मानाबादचे धाराशिव केलं.
 
एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेचे मंत्री आज होते, कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केलं आहे.”
 
“माणसं मोठी झाली. ज्याने मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली. सत्ता आल्यानंतर सगळं दिलं. ती लोकं नाराज झाली. मी मातोश्रीला आल्यानंतर साधी साधी लोक माझ्याकडे येत आहेत. ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना दिलं नाही ते सोबत आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
6) एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आणि बहुमत चाचणी
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. त्याआधी शिंदेंसोबतचे सर्व आमदार गोव्यात आणले गेले.
 
30 जानेवारीला दुपारपर्यंत सर्वत्र कयास होता की, देवेंद्र फडणवीसच नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. मात्र, शपथविधीचा वेळ जवळ येऊ लागला आणि अचानक सर्वत्र मोठी बातमी धडकली.
 
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असं भाजपकडून सांगण्यात आलं. फडणवीस सरकारबाहेर राहतील, असंही सांगण्यात आलं. मात्र, ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
 
त्यानंतर शिंदे गटातील आमदारांना गोव्यातून मुंबईत आणलं गेलं. कारण 3 जुलै 2022 रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं होतं.
 
3 जुलै रोजी बहुमत चाचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं यश मिळवलं.
 
भाजप, शिंदे गट, बविआ, प्रहार आणि अपक्षांचे एकूण 164 आमदारांचा पाठिंबा शिंदे सरकारला मिळाला, तर महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली.
 
सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव मांडला आणि भरत गोगावलेंनी अनुमोदन दिलं. शिरगणतीने बहुमताची चाचणी पार पाडली.
 
7) खासदारांमध्येही फूट
पुढे नोव्हेंबर महिन्यात जेव्हा राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा हे निमित्त होत शिवसेनेतल्या खासदारांनीही आपली बाजी पालटली.
 
18 खासदारांपैकी 12 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले, तर 6 खासदार केवळ उद्धव ठाकरेंसोबत उरले.
 
अरविंद सावंत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत आणि संजय जाधव हे पाच खासदार उरलेत. कारण सहावे खासदार, जे आधी उद्धव ठाकरेंसोबत होते, ते नंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले, ते म्हणजे गजानन किर्तीकर.
 
त्यामुळे 40 आमदार आणि 12 खासदार अशी लोकप्रतिनिधींची फौज एकनाथ शिंदेंच्या बाजूला आजच्या घडीला उभी आहे.
 
8) पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गेले
3 नोव्हेंबर 2022 रोजी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होतं. त्यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचं चिन्ह असलेलं ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगानं गोठवलं.
 
“जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही म्हणजे धनुष्यबाण नेमकं कुणाचं आहे हे आम्ही सगळी कागदपत्रं बघून अंतिमपणे ठरवत नाही, तोपर्यंत हा निर्णय लागू असेल,” असं निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह गोठवताना स्पष्ट केलं.
 
तसंच, ‘शिवसेना’ हे नाव वापरण्यासही कोर्टानं मनाई केली. त्यानंतर काही पर्याय मागवण्यात आले. त्यातून मग एकनाथ शिंदे यांच्या गटानं ‘बाळसाहेबांची शिवसेना’ हे नाव अंतिम केलं, तर उद्धव ठाकरेंच्या गटानं ‘शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव अंतिम केलं.
 
‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षानं ढाल-तलवार असं पक्षचिन्ह निवडलं, तर ‘शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षानं मशाल हे पक्षचिन्ह निवडलं.
 
नंतर शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या गटाला दिलं गेलं.
 
9) अंधेरी निवडणूक
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिली निवडणूक झाली ती मुंबईतच. अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्य निधनामुळे या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली.
 
या निवडणुकीत ठाकरे गटाने आधीच रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली होती.
 
या निवडणुकीपूर्वीच शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाच्या नावानं आणि ‘मशाल’ या चिन्हाअंतर्गत ऋतुजा लटके निवडणूक लढल्या.
 
हो-नाही करता करता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे निवडणूक जवळपास बिनविरोध झाली आणि ऋतुजा लटके जिंकल्या.
 
10) सुप्रीम कोर्टाचा निर्णय
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारा सर्वोच्च न्यायालयातला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत निर्णय 12 मे 2023 रोजी जाहीर करण्यात ला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं सर्वानुमते घेतलेला निकाल वाचून दाखवला.
 
या निकालानुसार :
 
1. व्हीप हा मुख्य राजकीय पक्षाचा लागू होतो, विधिमंडळ पक्षाचा होत नाही.
 
2. पक्षांतरबंदी कायदा लागू होऊन एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष घेतील.
 
3. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करुन दाखवण्याचा आदेश हा कायदेशीर बाबींना धरुन नव्हता.
 
4. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार ती बहुमत चाचणी रद्द करुन न्यायालय पुर्नस्थापित करु शकलो असतो, पण उद्धव यांनी चाचणीअगोदरच राजीनामा दिल्यानं ते शक्य नाही.
 
एकनाथ शिंदेंवरची अपात्रतेची टांगती तलवार सध्यातरी विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानं लांबणीवर पडली. परिणामी शिंदे-फडणवीस सरकार सध्यातरी स्थिर आहे.
 
11) वर्धापन दिनाचे दोन सोहळे
19 जून 2023 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही स्वतंत्रपणे शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा केला.
 
उद्धव ठाकरे यांच्या गटानं मुंबईतील षणमुखानंद सभागृहात, तर शिंदे गटानं गोरेगावच्या नेस्को मैदानात सोहळा आयोजित करण्यात आला. दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका केली.
 
या सोहळ्यांमधून ठाकरे आणि शिंदेंनी केलेल्या भाषणांपेक्षा चर्चा झाली ती, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या दोन स्वतंत्र वर्धापन दिन सोहळ्यांची.
 
दरम्यान, वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाकरे गटातील विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. तसंच, दोन दिवसांपूर्वी माजी आमदार शिशिर शिंदे यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. एकूणच बंडाच्या वर्षभरानंतरही ठाकरे गटातील गळती थांबता थांबत नाहीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोविड लसीमुळे भारतात हार्ट अटॅकचे प्रकरण वाढले आहे का?