महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून कोणत्याही चौकशीशिवाय राजीनामा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला गेला. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर अतिशय गंभीर आरोपानंतरही त्यांची साधी चौकशीही लागली नसल्याबाबत आता शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर वनमंत्री असलेले संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. अधिवेशनाच्या आधीच विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेतला गेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय झाल्याने आता शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमदारांची ही नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. आमदारांकडून या विषयावर थेट नाराजी व्यक्त होतानाच या संपुर्ण प्रकरणात शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा सूर आमदारांमध्ये आहे. एकुणच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संजय राठोड प्रकरणात बॅकफुटला गेली होती. पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय वापरला जात असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना वारंवार मिळणाऱ्या अभय प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांनी आता बोलायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय गंभीर आरोप असूनही त्या सगळ्या प्रकरणात चौकशी होत नाही. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यावर मात्र नुसते आरोप झाल्यावरही त्यांची चौकशी न करता त्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळेच शिवसैनिक या मुद्द्यावर आता चिडले आहेत.