निवडणुकीत सरळसरळ पक्षीय राजकारण सुरू झाले. एवढेच नव्हे तर निवडणूक म्हटल्यानंतर त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे येथे काही चालले नाही. उमेदवार उभे राहत गेले, पण त्यांचा पराभव होत गेला. आता, राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात विक्रम काळे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, येथील निवडणुकीत अखेर राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना त्यांच्याच पक्षातून प्रदीप सोळुंके यांनी आव्हान दिलंय. त्यानंतर आता विक्रम काळेंकडूनही मराठवाड्यात शिक्षकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने मला सांगितलं असतं तर तो निर्णय स्वीकारून मी बाजूला बसलो असतो. मात्र, पक्षाने मला जबाबदारी दिली असून नेतेमंडळी माझ्याच बाजूने आहेत, असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला आहे.
वडिलांचा वारसा चालवतायंत काळे
वडील वसंत काळे यांच्यानंतर विक्रम काळे यांनी या मतदारसंघावरची पकड घट्ट केली. शिक्षक दरबारसारखे उपक्रम राबविले. या मतदारसंघात अनेकदा त्यांनी संधी घेतली आणि ते विजयी होत गेले. यावेळेस विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध वाढतोय. राष्ट्रवादीच्या वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदीप सोळुंके यांनी प्रभावी काम केले. मात्र, आता ते काळेंविरुद्ध, पक्षाविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
कोण आहेत प्रदीप सोळुंके
सोळुंके हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची स्थापना करून या संघटनेचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००० मध्येच त्यांचा निवडणूक लढवण्याचा विचार होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यास काय करायचे याचाही ते विचार करीत आहेत. सध्या प्रदीप सोळुंके हे विक्रम काळे यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor