पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांना आता पाच लाखांपर्यंत पैसे काढण्याची सूट देण्यात आली आहे. खासकरुन ठेवी असलेल्या ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
पीएमसी बँकेत ज्या ग्राहकांच्या पाच लाख रुपयांपर्यंत ठेव आहे, ते एकावेळी ही रक्कम काढू शकतात. पीएमसी बँकेत अशा ठेवीदारांची संख्या ९६ टक्के आहे. वित्त मंत्रालयाने युनिटी एसएफबीमध्ये पीएमसी बँकेचे विलीनीकरण मंजूर केले. यामुळे पीएमसी बँकेचे मालमत्ता विक्री प्रक्रियेपासून बचाव झाला आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील हिस्सा खरेदीसाठी प्रस्ताव मागावले होते. चार गुंतवणूकदारांनी त्यात स्वारस्य दाखवले होते. त्यापैकी एसएफबी बँकेत हे विलिनीकरण करण्यात आले आहे.
पीएमसी बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्यांना आता त्यांची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येणार आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक (SFB) ने ही माहिती दिली. युनिटी एसएफबीने म्हटले आहे की, पीएमसी बँकेचे ठेवीदार पाच लाख रुपयांपर्यंत एकरकमी पैसे काढू शकतात किंवा त्यांची इच्छा असल्यास ठेव ठेवू शकतात. आता त्यांच्या पाच लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्यावर कोणतेही बंधन नाही. जे ठेवीदार त्यांच्या ठेवी ठेवतील, त्यांना वार्षिक सात टक्के दराने व्याज मिळेल. ज्यांना पैसे काढायचे आहेत त्यांना मूळ रक्कम परत मिळेल.
पीएमसी बँकेत अशा ठेवीदारांची संख्या ९६ टक्के आहे. या आठवड्यात मंगळवारी, वित्त मंत्रालयाने युनिटी एसएफबीमध्ये पीएमसी बँकेचे विलीनीकरण मंजूर केले. यामुळे पीएमसी बँकेला मालमत्ता विक्री प्रक्रियेपासून बचाव झाला आहे तसेच बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या रकमेचेही रक्षण झाले आहे. युनेटी एसएफबीने असेही म्हटले आहे की पीएमसी आणि सुमारे ११० शाखांचे सर्व कर्मचारी आता नवीन ब्रँड अंतर्गत काम करतील. युनिटी एसएफबीने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून याविषयीचे कामकाज सुरू केले होते.