"सत्ता परिवर्तन करणे ही 12 कोटी जनतेची इच्छा होती. महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे, असं त्यांना वाटाचयं. आता आपण मोकळा श्वास घेतोय. गेली अडीच वर्षे ही संघर्षात गेली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य सरकारनं केवळ सूड उगवला," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
फडणवीस म्हणाले, "या जनतेला सरकार म्हणजे कोण आहे, हेच लक्षात येत नव्हतं. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची अधोगती झाली. त्यामुळं आपण सत्तेकरिता परिवर्तन केलं नाही. राज्याला विकासाच्या गतीकडं नेण्यासाठी हे परिवर्तन करावं लागलं."
"एकीकडं भ्रष्टाचार करायचा, दुसरीकडं सूड उगवायला, असा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकारनं सुरू केला होता," असंही फडणवीस म्हणाले.