Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा
मुंबई , बुधवार, 6 जानेवारी 2021 (23:18 IST)
कोरोनाकाळातील पत्रकारांचे काम प्रशंसनीय : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कोरोनाकाळात पत्रकारांचे कार्य खूप कष्टप्रत होते. कष्टप्रत परिस्थितीत बहादुरी आणि धैर्याने केलेले काम प्रशंसनीय आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकारितेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून पूर्वजांप्रति आदर दाखविल्यास आशीर्वाद मिळतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आज (दि. 6 जानेवारी 2020) संपादक, पत्रकारांचा सन्मान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. कोरोनामुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती या वेळी प्रदान करण्यात आली. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि दै. पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर व्यासपीठावर होते. 
 
पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सौरभ गाडगीळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
जहाँ न पहुचे रवी; वहा पहुचे कवी या ओळींचा उल्लेख करून जहाँ नही पहुचे सरकार वहाँ पहुचे पत्रकार अशी कोटी कोश्यारी यांनी केली. ते पुढे म्हणाले, कोरोना काळात प्रत्येकाने एक-दुसर्याच्या मदतीने परिस्थितीला तोंड दिले. एकजुटीने प्रत्येकजण परिस्थितीशी लढत राहिला, ही बाब गौरवपूर्ण आहे. पत्रकारीता क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.
 
सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार (यांच्यावतीने संपादक संदिप काळे), न्यूज 18 लोकमत मुंबईचे संपादक आशितोष पाटील, झी 24 तासचे संपादक निलेश खरे (यांच्यावतीने दीपक भातुसे), लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने, पुढारी बेळगावचे वृत्तसंपदाक संजय सूर्यवंशी, लोकमत मुंबईचे सहाय्यक संपादक पवन देशपांडे, एबीपी माझा मुंबईच्या चीफ अँकर ज्ञानदा कदम, टिव्ही 9 मराठी मुंबईच्या चीफ अँकर निखिला म्हात्रे, वेबदुनिया इंदूरच्या रुपाली बर्वे, पुढारी पुणेचे दिगंबर दराडे, पुण्यनगरी बार्शीचे अजित कुंकुलोळ, लातूर लोकमतचे धर्मराज हल्लाळे यांचा सन्मान राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.
 
पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग (यांच्यावतीने संदिप चव्हाण), महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, इस्कॉन, अन्नामृत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भोसले, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, नारायणगावचे हर्षल मुथ्था, विसावा मंडख सांगलीचे अध्यक्ष संजय चव्हाण, सिनेअभिनेते स्वप्निल जोशी, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणेचे दर्शक हाथी, पियुष शहा यांचा विशेष सन्मानार्थींमध्ये समावेश होता.
 
महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी शैक्षणिक शिष्यवृत्तीसंदर्भात माहिती दिली. राज्यपाल कोश्यारी, मुंदडा आणि आनंद जैन यांच्या हस्ते पत्रकार स्व. मुदस्सर शेख यांची मुलगी जिब्राईल मुदस्सर शेख, टिव्ही 9 मराठीचे पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांची मुलगी पृथ्वीजा रायकर यांना 25 हजार रुपये शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश अनुक्रमे सोलापूरच्या बीआर न्यूज चॅनलचे संपादक मनिष केत आणि शितल रायकर यांनी स्वीकारला.
webdunia
शत्रुंजय एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक स्वप्निल शहा यांनी गरजू पत्रकारांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्यात येत असल्याची घोषणा केली. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर म्हणाले, विश्वासार्हता हे प्रसार माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. ते आपण हरवून बसलो आहोत की काय अशी परिस्थिती सध्या आहे. संयम, सजगता, सहनशिलता आणि संतुलन हा गोष्टींची आज माध्यमांमध्ये नितांत आवश्यकता आहे. सकारात्मक गोष्टींसाठी आक्रमकता असायला काही हरकत नाही. समाज आपल्याकडून खूप काही अपेक्षा करतो. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिले जाते, अशोकचक्रातील चौथा सिंह आपण आहोत. हा सिंह लपलेला आहे, हा लोप पावलेला नाहीये एवढेच फक्त समाजाला कळू द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
सौरभ गाडगीळ म्हणाले, पत्रकार संघाच्या चांगल्या उपक्रमात सहभागी होता आले याचा आनंद आहे. पत्रकार क्षेत्रातील काम खूप कठीण आहे. प्रत्येक क्षेत्रातील घडमोडींकडे पत्रकार लक्ष ठेवून असतो. पत्रकारीच्या माध्यमातून खूप चांगले काम होत असल्याबद्दल त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करून छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नसून संपूर्ण देशाचे असल्याचे त्यांनी नमुद केले.
 
योगेश जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळात पोलिसांबरोबर पत्रकार, फोटोग्राफर आपला जीव धोक्यात घालून लढत होते. परिस्थितीची, रुग्णांची माहिती देत होते. पत्रकारीतेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम पत्रकार करीत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरत होत्या. येणारी माहिती खरी की खोटी हे लोकांना समजत नव्हते. पण प्रसार माध्यमांनी वास्तव जनतेसमोर मांडले. पोलिसांप्रमाणेच पत्रकारांनाही विमा संरक्षण मिळावे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे प्रिंट मीडियाचे कसे होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण सध्या प्रिंट मीडियालाही सुखाचे दिवस आहेत, काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण जे लिहितो, सांगतो त्यावर लोकांचार विश्वास आहे. विश्वासार्हत हा प्रसार माध्यमांमध्ये महत्त्वाचा घटक असणार आहे. विश्वासार्हत आपण जो पर्यंत जपू तो पर्यंत आपल्या क्षेत्राला मरण नाही. ते पुढे म्हणाले, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशांमध्ये रेव्हेन्यू शेअरिंग कायदा ते आणू पाहात आहे. जेणे करून फेसबूक, गुगल हे त्यांचा 30 टक्के रेव्हेन्यू न्यूज जनरेट करणार्यांमध्ये शेअर करावा लागेल. हा कायदा अगदी योग्य आहे. हा कायदा आपल्या देशात यावा यासाठी सर्व प्रसारमाध्यमांनी जनमत तयार करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि किरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. पुढारीच्या चेअरमनदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जावध यांचा विशेष सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत किरण जोशी, व्यंकटेश पटवारी, डॉ. शिबू नायर यांनी केले.
 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी प्रास्ताविक समाज आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांनी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. आशिष देशमुख यांनी आभार मानले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुजराती मतदारांची गरज का भासली?