महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात व छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय, "दाऊद हा राष्ट्रदोही आणि त्याला पाकिस्तातून इकडे आणण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणीच रोखले नाही. पण, दाऊदच्या नावावर राजकीय भाकरीचे तुकडे तोडणे थांबवा एवढंच आमचं म्हणणं आहे. भाजपला दाऊदच्या नावाचं राजकारण करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी विधिमंडळात घटनेचा बळी दिला.
"मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्यांना साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात व शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग राग इतिहासात कुणी केला नसेल."
अग्रलेखात पुढे म्हहटलंय, "अनेक राज्यांच्या विधानसभेत अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही. त्यांनी जय हिंद म्हटले नाही व जय महाराष्ट्र म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे.
"अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडवण्यात आलं त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले आहे."