अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दिपाली यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्याच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचंं म्हटलं होतं. सरकारने या प्रकरणाची दखल घेत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना निलंबित केलं आहे.
विनोद शिवकुमार यांच्यासह प्रधान मुख्य वनरक्षक एम. एस. रेड्डी यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. तर एम. एस. रेड्डी यांची इतर पदावर बदली करण्यात येणार आहे. तर एम. एस. रेड्डी यांच्या जागी प्रविण चव्हाण यांची मुख्य वनरक्षकपदी वर्णी लावण्यात आली आहे.
उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी महिलांनी केली. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंंतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून आणि दिपाली चव्हाण यांचे पती यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची बाजू समोर आली. आता सरकारने तात्काळ कारवाई करत दोन्ही अधिकाऱ्यांना झटका बसला आहे.
दरम्यान, विनोद शिवकुमार यांनी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी दिली होती. तसेच मला शिव्या देखील दिल्या. त्यांनी नेहमी मला नियम बाह्य काम करण्यास भाग पाडलं, असा आरोप दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.