Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

यंदा पालखी रथाला जीपीएस सिस्टीम अन् CCTV; गुगल मॅपद्वारे कळणार रथाचे लोकेशन

vari
, शुक्रवार, 9 जून 2023 (22:38 IST)
300 वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. लाखो वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येनं या वारीत सहभागी होतात. ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत विठुरायाच्या दर्शनाला पायी चालत जातात.अनेक गावात वारीचा मुक्काम असतो. यादरम्यान अनेक गावांमध्ये वारीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. या सगळ्या वारकऱ्यांना आता आषाढी वारीची आस लागली आहे.
 
याच पार्श्वभूमीवर उद्या देहूच्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर 11 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होणार आहे. दरम्यान जसंजसं तंत्रज्ञान वाढत आहे तसंतसं वारीला देखील परंपरेसोबतच तंत्रज्ञानाची जोड लागताना दिसत आहे. आषाढी वारी सोहळा दिवसेंदिवस हायटेक होत चालला आहे. याचाच एक भाग म्हणून पालखी रथाला आता जीपीएस प्रणाली जोडण्यात आलेली आहे. यामुळं गुगल मॅपद्वारे रथाचे लोकेशन कळणार आहे. सोबतच नऊ सीसीटीव्हीद्वारे फेसबुक लाईव्ह करून घरबसल्या दर्शन ही घेता येणार आहे.
 
या सगळ्या सोहळ्या दरम्यान पालखीची सुरक्षा चोखदार यांच्या हाती असते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वारकऱ्यांची एखादी गोष्ट हरवली तर चोखदार मदत करतात. या जीपीएस सिस्टीम आणि सीसीटीव्हीमुळे आता या चोखदारांचं काम सोपं झालं आहे.
 
यंदा या पालखीला कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यावरुन मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाच नाही तर लाखो भाविकांना घरबसल्या पालखीचं दर्शन घेता येणार आहे.
 
दरम्यान विठुरायाची आस लागलेला वारकरी संप्रदाय आता देहू नगरीत दाखल होऊ लागले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानात आणि पायी वारीत हा वारकरी सहभागी होणार आहे. प्रस्थानाला काही तास उरले असतानाच देहू नगरीत वैष्णवांचा मेळा रंगू लागला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळं पेरणी न झाल्याची खंत या वारकऱ्यांच्या मनात आहे. मात्र विठुरायाच्या चरणी माथा टेकल्यावर ती खंत दूर होईल आणि बळीराजा नक्की सुखावेल, अशी आशा घेऊन आषाढी सोहळ्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
तर विठुरायाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी वारकरी अडीचशे किलोमीटरची पायपीट करतो. तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. कारण टाळ-मृदंगाचा ताल या वारकऱ्यांचा थकवा दूर करत असतो. त्याच टाळ मृदुगाच्या डागडुजीची लगबग सध्या देहू-आळंदीत पाहायला मिळत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कठीण काळातून जात आहे म्हणत काजोलने सोशल मीडियाला ठोकला रामराम!