बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. येथील रजिस्ट्री ऑफिसमध्ये एका नगरसेवकानं दोघांना गोळीबार केला आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमीझाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये काही जणांमध्ये जमिनीचा वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर बीडमधील एका नगरसेवकानं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं दोन जणांना बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी काही साथीदारांच्या मदतीनं दोघांना काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर नगरसेवकानं सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी या दोघांवर गोळीबार केला आहे. या घटनेत सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली आहे तर फारुक सिद्दीकी यांच्या पायाला गोळी स्पर्श करून गेली असून दोघेही जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर सर्व पुरावे गोळा केले आहे. दोन्ही जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.