राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने अॅड गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांना दोनदा पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची आणखी चौकशी करायची असल्याने पुन्हा पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. मात्र, न्यायालयाने सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सदावर्ते यांनी चिथावणी दिल्यानेच एसटी संपकरी आंदोलकांच्या एका गटाने शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्यावतीने अॅड गिरीश कुलकर्णी यांनी बाजू मांडली. दरम्यान, प्रत्येक सुनावणीत सदावर्ते यांची बाजू नवनवीन वकिलांनी मांडली आहे. त्यामुळे आज तिसऱ्या सुनावणीत तिसरा वकील बाजू मांडत असल्याचे दिसून आले.