Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गर्लफ्रेंडची हौस भागावी म्हणून त्याने केला हा उद्योग; व्हॉटसअॅप स्टेटसने असा झाला भांडाफोड

crime
, सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (07:58 IST)
प्रेमात पडलेले प्रेमवीर एकमेकांसाठी कधी काय करतील याचा नेम नाही. विशेषतः प्रियकर आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी, तिची हौस पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याचे धाडस करतो. असाच एक प्रकार अंबरनाथमध्ये उजेडात आला आहे. प्रियकराने आपल्या प्रियसीला इम्प्रेस करण्यासाठी चक्क दुकानात चोरी केली. आणि हा सर्व प्रकार अतिशय रंजकरित्या समोर आला आहे.
 
अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, गर्लफ्रेंडला आयफोन आणि स्कूटर घेऊन देण्यासाठी प्रियकर आग्रही होता. अखेर त्याने एक शक्कल लढविली. तो ज्या दुकानात पूर्वी काम करत होता तेथेच त्याने चोरी करण्याचा प्लॅन आखला. मात्र या चोरट्याने ठेवलेल्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे त्याच्या मालकाला संशय आला आणि पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
 
अंबरनाथ पश्चिमेला रेल्वे स्टेशनजवळ सुनील महाडिक यांचं ओम श्री साईराम अगरबत्ती भांडार हे अगरबत्ती आणि पूजा साहित्याचं दुकान आहे. त्याच या दुकानात राज आंबवले हा तरुण कामाला होता. मात्र तो आर्थिक अफरातफर करत असल्याचं लक्षात आल्यानं महाडिक यांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. महाडिक यांनी सप्लायरला देण्यासाठी अडीच लाखांची रोकड घरून आणली होती. मात्र सप्लायर न आल्यानं ही रोकड ड्रॉव्हरमध्ये ठेवून ते घरी गेले.
 
दुसऱ्या दिवशी ते दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेले आढळून आले. तर ड्रॉव्हर चावीने उघडून त्यातले दोन लाख रुपये आणि एक सोन्याची चेन चोरून नेल्याचं त्यांना आढळले. त्यामुळे महाडिक यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
दरम्यान, काही दिवसांनी महाडिक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या राज आंबवले याने त्याच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गर्लफ्रेंडला नवीन आयफोन आणि नवीन ऍक्टिव्हा स्कुटर फोटो टाकले. ते पाहून सुनील महाडिक यांना संशय आला. कारण महाडिक यांचा पैशाचा ड्रॉव्हर चावीने उघडून चोरी झाली होती. आणि ते ड्रॉव्हरची चावी कुठे ठेवायचे, हे फक्त राज आंबवले यालाच माहीत होते. त्यामुळे महाडिक यांनी पोलिसांकडे याबाबतचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी राज याला उचलून आणत त्याला पोलिसी खाक्या दाखविला अखेर राज याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कामावरून काढल्याचा जुना राग आणि गर्लफ्रेंडला फोन, स्कुटर घेऊन द्यायची असल्याने आपणच ही चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर