Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उष्माघाताचा पशूधनालाही धोका : शेकडो शेळ्या, हजारो कोंबड्या दगावल्या- अशी घ्या काळजी

bird flu
, गुरूवार, 30 मे 2024 (12:11 IST)
जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोड्यातील माळरानावर दुःखाचे सावट होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य, चारा टंचाई या विरोधात मेंढपाळ कुटुंबांचा लढा सुरू असतानाच त्यांच्यावर उष्माघाताने 100 हून अधिक शेळ्या-मेंढ्या दगावल्याने जळगाव जिल्ह्यातील मेंढपाळांवर संकटाचा डोंगरच कोसळला.
 
आपल्या मृत शेळ्या-मेंढ्यांकडे पाहू सुद्धा न शकणाऱ्या या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूशिवाय काहीच दिसत नव्हते. आजूबाजूला लोकप्रतिनिधी, पशू-चिकित्सक, पोलीस या प्राण्यांच्या मृत्यूचा पंचनामा करण्यासाठी आले होते.
 
स्थानिक पत्रकारांचा गराडा होता, पंचक्रोशीतील अनेक लोक नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी आले होते, पण कुऱ्हा काकोड्यातील मेंढपाळ यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीतच नव्हते. कुऱ्हा काकोड्यातील कुटुंबातील महिला आपल्या पदराने डोळे पुसत, निश्चल बसलेल्या होत्या.
 
पशूधनाला सर्व काही मानणाऱ्या या कुटुंबांसमोर आता अनेक प्रश्न आ वासून उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासारख्याच इतर अनेक कुटुंबांसमोर देखील या भर उन्हाळ्यात आपल्या पशूंची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न समोर आहे. गेल्या काही दिवसांत तीव्र उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका जसा माणसाला बसत आहे तसा तो पाळीव पशूंनाही बसल्याचे दिसत आहे.
 
राज्यातील अनेक कुटुंबांची उपजीविका ही शेळ्या-मेंढ्या आणि कुक्कुटपालनावर चालते. त्यात गेल्या काही दिवसांमध्ये उष्माघाताने हे पशू-पक्षी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याने पुढे काय करायचे हा प्रश्न आता हा व्यवसाय करणाऱ्यांना पडला आहे.
 
कोंबड्यांचाही मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये 22 मे रोजी एकाच वेळी शेळ्या-मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. पशू चिकित्सकांनी घटनास्थळाची पाहणी केली, पोलिसांनी पंचनामा करत पुढील कारवाई सुरू केली आहे.
 
या घटनेनंतर प्रशासनाने या भागाची पाहणी केली. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी गेल्या आठवड्यात दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. काही वेळासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. ही परिस्थिती केवळ जळगाव जिल्ह्यातच आहे असं नाही.
 
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी या ठिकाणी 1200 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. पूर्ण सिजनमध्ये केलेली मेहनतच वाया गेली असून अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोल्ट्री व्यावसायिक तुकाराम जाधव सांगतात.
 
तुकाराम जाधव यांच्याकडं एकूण 4200 कोंबड्या होत्या. मंगळवारी दुपारी वीजपुरवठा बंद झाला. उन्हाचा तडाखा कोंबड्यांना बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे जाधव यांनी सांगितलं. हा व्यवसाय कंत्राट पद्धतीवर आहे, कोंबड्यांच्या पिल्लांना सांभाळून त्यांची वाढ झाल्यानंतर ते कंपनीला विकायचे असतात. पण आता एकदम 1200 कोंबड्या नसल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न तर गेलेच त्याशिवाय आधी सांभाळण्यासाठी लागलेले श्रमही गेल्याचे जाधव सांगतात.
 
खतांच्या वाढत्या किमती आणि शेतमालाला रास्त बाजारभाव मिळण्यात असलेल्या अनिश्चिततेमुळं शेतीचे नुकसान होत होते. त्यामुळे मी शेतीसोबतच कुक्कुट पालनाचा पर्याय निवडला. पण आता निर्माण झालेल्या स्थितीमुळं गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं जाधव सांगतात.
 
राज्यात अनेक ठिकाणी कोंबड्यांचे मृत्यू झाल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात 1,500 हून अधिक कोंबड्या दगावल्या. वर्धा आणि अकोल्यातही हजारहून अधिक कोंबड्या दगावल्या. त्यामुळं या भागातल्या पोल्ट्री व्यावसायिकाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
 
उष्णतेच्या लाटेमुळे काय होऊ शकते?
शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील महत्त्वाचा वाटा असलेल्या जनावरं किंवा कोंबड्यांवर उष्णतेच्या लाटेमुळं गंभीर परिणाम होऊ शकतो. उष्णतेच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास जनावरं आणि कोंबड्या या प्रचंड संवेदनशील असतात. त्यांना लगेचच याचा त्रास जाणवू लागत असतो.
 
वाढलेल्या उष्णतेच्या दुष्परिणामांचा विचार करता दुभत्या जनावरांमध्ये दूध देण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याचबरोबर मांस उत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते, असं आयसीएआरच्या उष्णतेच्या लाटेसंदर्भातील अहवालामध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर या जनावरांच्या प्रजनन दरावरही याचा परिणाम होऊ शकतो. तसंच जनावरं आणि कोंबड्यांच्या मृत्यूचा मोठा धोका असतो.
 
अनिश्चित हवामानाचा जास्त त्रास
डॉ. अजय देशपांडे व्हेटरनरी डॉक्टर आहेत. देशपातळीवरील व्हेट्स इन पोल्ट्री (VIP) संघटेनेचे ते अध्यक्ष आहेत. जवळपास 1000 व्हेटरनरी डॉक्टर या संघटनेचे सदस्य आहेत, अशी माहिती त्यांनी बीबीसी मराठीला दिली. संपूर्ण राज्यात महिन्याला अंदाजे कोंबडीच्या 5 कोटी पिलांचं संगोपन केलं जातं.
 
वार्षिक उलाढालीचा विचार करता राज्यभरात महिन्याला अंदाजे 800 कोटींची उलाढाल पोल्ट्री व्यवसायात होत असल्याचं डॉ. अजय देशपांडे यांनी सांगितलं. "सध्या वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण खूप जास्त आहे. कोंबड्यांना कोरड्या उष्णतेपेक्षा आर्द्रतेचा जास्त त्रास होत असतो. कारण त्यामुळं त्यांना श्वास घेण्यात अडचणी येतात.
 
त्यामुळं शेडमध्ये फॉगर किंवा इतर माध्यमातून कितीही कुलिंगची व्यवस्था केली तरीही आर्द्रता वाढते. परिणामी हवा कमी झाली की, मृत्यूचं प्रमाण वाढतं," असंही देशपांडे म्हणाले. याबरोबरच सध्या पाण्याचं प्रचंड दूर्भिक्ष्य आहे. त्यामुळंही उपाययोजना करण्यावर मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
हवामानातील अनिश्चितता हाही यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असं देशपांडे म्हणाले. वातावरण मध्येच थंड होतं, तर मध्येच उष्णता वाढते. त्यामुळं पशू पक्ष्यांना वातावरणाशी जुळवून घेणं अवघड होतं, असं त्यांनी सांगितलं. या सर्व परिस्थितीमुळं पोल्ट्री व्यावसायिक हतबल असून पाऊस पडून वातावरण कधी थंड होईल याची वाट पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोल्ट्री व्यवसायाचा कृषी क्षेत्रात मोठा वाटा आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीला पोल्ट्रीचा जोडधंदा आहे. त्यामुळं या भागात शेतकरी आत्महत्या कमी आहेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
 
अशी घ्या काळजी
उष्णतेच्या लाटेमुळं कोंबड्या किंवा जनावरं यांच्यावर होणारे हे गंभीर परिणाम टाळण्याच्या संदर्भात इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्चच्या अहवालात काही उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे शेती आणि शेतीसंबंधित व्यवसायांवर होणाऱ्या परिणांचे संशोधन या अहवालात आहे. ICAR ने पशूपालन, कुक्कुटपालनासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. त्याचा वापर करून या उष्णतेच्या लाटेचा परिणाम काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
 
शेड थंड ठेवण्याचा प्रयत्न करा-
जनावरं किंवा कोंबड्या असलेल्या शेडमधील तापमान कमी होण्यासाठी कापड, ताडपत्री किंवा इतर प्रकारचं इन्सुलेशन वापरावं. त्यातून तीन ते पाच अंशापर्यंत तापमान कमी केलं जाऊ शकतं.
फॉगर्सच्या माध्यमातून वेळोवेळी पाण्याची फवारणी करावी किंवा पड्यांवर पाणी शिंपडावे म्हणजे तापमान नियंत्रणात राहू शकते.
शेडमध्ये फॅन आणि कूलरची व्यवस्था करून तापमान कमी करावे म्हणजे, उष्णतेच्या लाटेचा धोका कमी होऊ शकतो.
थेट सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून शेड नेटचा वापर करावा.
उकाडा कमी करण्यासाठी हवा खेळती राहावी याची काळजी घ्यावी.
खाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या खाद्याचं प्रमाण योग्य ठेवावं, खाद्य कमी पडू देऊ नये.
कोंबड्यांमध्ये उन्हामुळं निर्माण होणाऱ्या पोषणाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रामुख्यानं एनर्जी आणि अमिनो अॅसिड्सयुक्त खाद्यात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करावी.
आहार कमी होऊ नये म्हणून कोंबड्यांना पहाटे 5 वाजेच्या आधी आणि सलायंकाळी 5 वाजेनंतर खायला द्यावे म्हणजे दुपारी बाहेरील उष्णता वाढते तेव्हा पचनामुळं निर्माण होणारी उष्णता वाढणार नाही.
कोंबड्यांना दिवसात सर्वाधिक तापमान असेल त्यावेळी थंड पाणी द्यावे.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोंबड्यांना आहारात ऑस्मोलाइट्स (बीटेन, पोटॅशियम), अँटि-ऑक्सिडंट व्हिटामिन (सी, ई, ए), ट्रेस मिनरल्स (झेड, सीयू, एमएन, एसई, सीआर), इलेक्ट्रोलाइट्स द्यावे.
जनावरांना बाहेर चरण्यासाठी नेणं टाळावं त्याऐवजी शेडमध्येच त्यांच्यासाठी खाद्य आणि हिरव्या चाऱ्याची सोय करावी.
जनावरांना पाण्याने अंघोळ घालावी.
 
Published By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोपीच्या रक्ताचा नमुना आईच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला - पुणे पोर्श अपघात अहवाल