पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे येथे चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी दाखल झालेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकांसह ७ जण जखमी झाले आहेत. मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चौथ्या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.