Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, कसे आहेत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नवीन दर

tuljapur
, शनिवार, 8 जुलै 2023 (21:52 IST)
महाराष्ट्रातील शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येत असतात. यापुढे विश्वस्त कोट्यातून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाचे शुल्क महागणार आहे. तुळजापूर मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
असे आहेत नवीन दर?
श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी विश्वस्त कोट्यातूनही दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. तर अभिषेकासाठी पाचशे रुपये आकारण्यात येतील. वास्तविक, तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त कोट्यातून भाविकांना यापूर्वी व्हीआयपी दर्शनाची मोफत मुभा उपलब्ध करून दिली जात होती. यातच आता बदल होणार आहे. व्हीआयपी दर्शनासोबतच अभिषेक पुजेच्या दरातही बदल करण्याचा ठराव मंदिर समितीने संमत केला आहे. सोमवार दहा जुलैपासून या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.
 
तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळाची बैठक चार जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शन आणि अभिषेक पासबाबत यापूर्वी घेण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे निर्णय घेण्यात आले. सोमवारपासून दोन्ही ठरावांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. दरम्यान, भाविकांकडून धार्मिक विधी कर अधिक आकारू नये. त्यास पुजाऱ्यांचा विरोध असल्याचे निवेदन तुळजाभवानी पुजारी मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : छगन भुजबळ यांचा शरद पवारांना मिश्किल टोला