कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र लसीकरण आणि कोरोना नियंत्रणात आल्याने यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत .यामुळे आवडत्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईसह राज्यभरात भक्तांनी समुद्र किनारी, चौपाट्यांवर आणि रस्त्यावर एकच गर्दी केली होती. यावेळी राज्यभऱात वेगवेगळ्या ठिकाणी काही अप्रिय घटनाही घडल्या. ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात गणेश विसर्जन सोहळ्याला मात्र गालबोट लागले.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार १९ मृतांपैकी १४ जणांचा मृत्यू हा गणपती विसर्जन करताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून झाला आहे. तर चार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. ठाण्यात गणपतीची आरती सुरू असतानाच अचानक भलेमोठे झाड गणेश मंडपावर कोसळल्याने आरती वालावरकर या महिलेचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. तसेच यावेळी विसर्जन सोहळ्यात अनेक ठिकाणी कायद्या सुव्यवस्थेचा बोजवाराही उडाल्याचे बघायला मिळाले.
वर्धा जिल्ह्यातील सवांगी येथे गणेश विसर्जन करते वेळी पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. तर येथील देवली या ठिकाणी एका महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच यवतमाळ जिलह्यातही गणेश विसर्जनावेळी दोन जण बुडाले. तर अहमदनगर जिलह्यातील सुपा आणि बेलवंडी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जळगाव येथे अन्य दोघांचा मृत्यू झाला. पुणे येथील ग्रामीण भागात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.