'कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे सांगायला मी उद्धवजींसारखा डॉक्टर आणि संजय राऊत यांच्यासारखा कंपाऊंडर नाही,' असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
'तिसरी लाट येऊही शकते. पण कोरोना फक्त उद्धवजींशीच बोलतो. आता दुसरी लाट बऱ्यापैकी आवाक्यात आली आहे. त्यामुळं जनजीवन सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.
शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही यावेळी पाटील यांनी केली आहे. शाळा सुरू नसल्यानं मुलांच्या जीवनावर परिणाम होत आहे. मुलं जणू शाळाच विसरली आहेत, अशी परिस्थिती असल्याचं पाटील म्हणाले.
दरम्यान, पाटील यांच्या या वक्तव्यावर औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादस दानवे यांनी लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे चांगले डॉक्टर आहेत म्हणूनच त्यांनी भाजपचं ऑपरेशन करून सेनेची सत्ता आणली असं दानवेंनी म्हटलं.