"भोसरी भूखंड खरेदीची याआधी पाच वेळा चौकशी झालेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही याची चौकशी केली आहे. यातून आतापर्यंत काहीही हाती लागलं नाही. तरीही यात आता ईडीकडून चौकशी केली जात आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
गुरूवारी (8 जुलै) एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहचल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
"ही चौकशी राजकीय हेतूने होत आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. मी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जसा मी पक्ष बदलला तश्या माझ्यावर कारवाया सुरू झाल्या. पण मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे," असंही खडसे यांनी म्हटलं.
भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी बुधवारी (7 जुलै) एकनाथ खडसे यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं. त्यानंतर आज (8 जुलै) एकनाथ खडसे हे पत्रकार परिषद घेणार होते. परंतु रात्री उशीरा खडसे यांची तब्येत बिघडल्यामुळे पत्रकार परिषद रद्द करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांनी दिलेल्या तब्येतीच्या कारणामुळे एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत असं बोललं जात होतं. पण ते सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
जावई गिरीश चौधरी अटकेत
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे भोसरी भूखंड प्रकरणी ही अटकेत आहेत. त्यांना 12 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंगळवारी (6 जुलै) गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते चौकशीला सहकार्य करत नसल्याचं ईडीने कोर्टात सांगितलं. बुधवारी (7 जुलैला) गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली.
काय आहे भोसरी भूखंड प्रकरण?
2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री होते.
त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52 /2अ /2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केला.
हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अकानी नामक या व्यक्तीकडून खरेदी केला होता. पण या भूखंडाचा सातबारा 'एमआयडीसी' च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौकशी आणि अकानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. परंतु 2018 एकनाथ खडसे यांना क्लिन चिट देण्यात आली.
दरम्यान, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी झोटींग कमिटीची स्थापन करण्यात आली. या समितीमार्फतही प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.