नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील आणि त्यांच्या पतीचा मोबाईल सकाळपासून बंद असल्याची माहिती निकटवर्तीयांकडून आली होती. शिवाय, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुभांगी पाटील अर्ज मागे घेऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र या चर्चांना शुभांगी पाटील यांनी पुर्णविराम दिला आहे. दुपारच्या सुमारास शुभांगी पाटील यांनी नाशिक आयुक्त कार्यालयात हजेरी लावत आपली उमेदवारी कायम असल्याचे सांगितले.
नाशिक आयुक्त कार्यालयात हजेरी लावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शुभांगी पाटील यांनी नॉट रिचेबल असण्याबाबत खुलासा केला. यावेळी शुभांगी पाटील यांना पत्रकारांनी तुम्हाला धमकी मिळाली होती का असा सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, “मला धमकी आली की नाही हे नॉटरिचेबलवरून कळलं असेल”.
पुढे शुभांगी पाटील म्हणाल्या की, “माझी उमेदवारी कायम असून, मला ठाकरे गटाचा अधिकृत पाठिंबा आहे. माझा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. तसेच, महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे”.
“मी बऱ्याच शिक्षक संघटनेशी चर्चा केली आहे. तसेच, त्यांचा पाठिंबा मागितला आहे. मला विश्वास आहे की, सर्व शिक्षक संघटना मला पाठिंबा देतील. कारण मी शिक्षक उमेदवार आहे. शिक्षकांचे मागील 10 वर्षांपासून अनेक प्रलंबित असलेले वेतन न मिळणे, पेन्शन, पदभरती असे हजारो प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच माध्यमातून मी आज पुढे आली आहे. शिवाय मला माझ्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता माझा उमेदवारी अर्ज कायम झाला असून, मला लढण्यासाठी तेच पाठबळ देतील”, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor