गोव्यातील निवडणुकीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आशिष शेलार यांनी दिलेल्या आव्हानाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट वाचलं तर राऊत सांगतील त्याठिकाणी चहा आणि जेवण देईल, असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलं होतं. त्यावर राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
'शेलारांना मी नेहमीच चहा पाजतो. भाजप 1989 पासून गोव्यात काम करत आहे. सलग दोन वेळा त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण डिपॉझिट जप्त झालं म्हणजे लढूच नये,' असं नसल्याचं राऊत म्हणाले.
"बचेंगे तो और भी लढेंगे, असा मराठा साम्राज्याचा मंत्र आहे आणि तसंच लढणारे आम्ही लोक आहोत. तुमच्यासारखं भ्रष्ट, माफिया, व्याभिचारी यांना तिकिटं देऊन आम्हीही जिंकू शकलो असतो, असंही राऊत म्हणाले.