शुक्रवारपासून श्रावणमासाला प्रारंभ होणार असल्याने मंगळवारी चिकन आणि मटणाच्या मागणीत वाढ झाली होती. श्रावणात मांसाहार वर्ज्य करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे श्रावणापूर्वीच्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मांसाहाराला अधिक मागणी असणार आहे. चिकन, मटण, मासे, खेकडे व अंडय़ांना मागणी वाढल्याचे दिसत आहे. राज्यात शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील मंगळवारी सकाळपासून चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती.
श्रावण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मांसाहारप्रेमींनी चिकन, मटण, मासे खरेदीला पसंती दिली आहे. गत दोन वर्षांत कोरोनामुळे चिकन, मटण दुकानांवरदेखील निर्बंध आले होते. मात्र यंदा यात्रा-जत्रा आणि चिकन, मटण दुकानेदेखील सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे मंगळवारी दुकानांमध्ये मांसाहारप्रेमींनी गर्दी केली होती. शिवाय बुधवारी व गुरुवारीही मांसाहाराला मागणी वाढणार आहे. श्रावणात विशेषतः उपवास इतर पूजा-अर्चा केल्या जातात. त्यामुळे याकाळात शाकाहार व फळांना अधिक मागणी असते.