Increase in dengue patients शहरात डेंग्यूच्या तापात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षी आतापर्यंत डेंग्यूचे एकूण 1,318 संशयित रुग्ण आणि 96 बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर विभागीय कार्यालयांतर्गत आढळून आले आहेत. या दोन भागात शहरातील 32 टक्के डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. मे आणि जून महिन्यात शहरात पाऊस झाला नाही. त्यामुळे या दोन महिन्यांत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहरात डेंग्यूने थैमान घातलं आहे. जुलैमध्ये एकूण 225 संशयित आणि 18 बाधित रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात 16 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण 512 संशयित आणि 47 बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे निश्चित निदान झालेल्या 96 रुग्णांची महापालिकेत नोंद झाली आहे.